मोर्चामुळे इफ्तार पार्टीला जाणे अशक्य -लालूप्रसाद
By admin | Published: July 11, 2015 12:31 AM2015-07-11T00:31:11+5:302015-07-11T00:31:11+5:30
राजद आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदामुळे आपण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातर्फे १३ जुलै रोजी दिल्लीत आयोजित
पाटणा : राजद आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदामुळे आपण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातर्फे १३ जुलै रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत हजर राहणार नसल्याच्या वृत्ताचे राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी खंडन केले.
‘सोनिया गांधी यांनी मला या इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिलेले आहे; परंतु १३ जुलै रोजी आम्ही पाटण्याच्या राजभवनवर धडक मोर्चा आयोजित केलेला असल्याकारणाने इफ्तार पार्टीला येऊ शकत नाही, असे मी विनम्रपणे सोनिया गांधी यांना कळविले आहे,’ असे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले.
सामाजिक-आर्थिक-जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवाय १३ जुलै रोजीच आम्हीदेखील पाटण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे, असे सांगून लालूप्रसाद म्हणाले, सोनिया गांधी यांच्या इफ्तार पार्टीला हजर राहण्यास असमर्थ असल्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. असा चुकीचा अर्थ काढणारे लोक आमच्या विरोधातील घटकांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले नसते, तर आपण सोनिया गांधी यांच्या इफ्तार पार्टीत अवश्य हजर राहिलो असतो; पण आता मी जरी जाणार नसलो तरी माझा प्रतिनिधी म्हणून खासदार प्रेमचंद गुप्ता आणि खासदार जयप्रकाश यादव यांना पाठविणार आहे.
दोन्ही इफ्तार पार्टी एकाच तारखेला आयोजित करण्यात आल्याबद्दल आपण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही चर्चा केली आणि सर्व प्रकारच्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सोनिया गांधी यांच्या इफ्तार पार्टीला जाण्याची सूचना आपण त्यांना केली आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)