अजब योगायोगच म्हणायचा, किडनी स्वॅपिंगमुळे वाचले दोन जणांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 02:28 PM2022-09-24T14:28:34+5:302022-09-24T14:29:01+5:30
दोन्ही रुग्णांच्या पत्नीचा रक्तगट आपल्या पतीच्या रक्तगटाशी जुळत नव्हता
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गंभीर स्वरूपाच्या आजारांशी झुंजत असलेल्या दोन रुग्णांनी आपापल्या पत्नीच्या किडन्यांची अदलाबदल केली. त्या किडन्यांचे प्रत्यारोपण केल्यानंतर दोन्ही रुग्णांचे प्राण वाचले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासंदर्भात या रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही कुटुंबातील एक-एक पुरुष सदस्य किडनीच्या विकाराने आजारी होते. किडनीचे प्रत्यारोपण केल्यास त्यांचे प्राण वाचू शकणार होते. मात्र त्यात वैद्यकीय पेच असा होता की, दोन्ही रुग्णांच्या पत्नीचा रक्तगट आपल्या पतीच्या रक्तगटाशी जुळत नव्हता. त्यामुळे पत्नीच्या किडनीचे प्रत्यारोपण पतीच्या शरीरात करता येणार नव्हते. मात्र दुसऱ्या रुग्णाच्या पत्नीचा रक्तगट पहिल्या रुग्णाशी व पहिल्या रुग्णाचा रक्तगट दुसऱ्या रुग्णाच्या पत्नीच्या रक्तगटाशी जुळत होता.
त्यामुळे दोन्ही रुग्णांनी व त्यांच्या पत्नींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अनोखा निर्णय घेतला. या पत्नींनी एकमेकांच्या किडनीची अदलाबदल केली. या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांचे प्राण वाचले आहेत. किडनी देणाऱ्या दोन महिला व शस्त्रक्रिया झालेले त्यांचे पती यांची प्रकृती उत्तम आहे.
दोन वर्षांपासून रुग्ण होते डायलिसिसवर
किडनीच्या विकाराने आजारी असलेले दोन्ही रुग्ण गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. त्यांना किडनी प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.
या दोन रुग्णांच्या पत्नींच्या किडनींची अदलाबदल करून प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडण्याच्या निर्णयास सरकारी समितीने संमती दिली.
या दोन्ही रुग्णांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास सात तासांचा वेळ लागला.