काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 07:30 AM2024-05-24T07:30:47+5:302024-05-24T07:31:27+5:30
अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील.
सिद्धार्थनगर : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झाले असून त्यात भाजपला ३१० पेक्षा अधिक जागा मिळतील तर काँग्रेस ४० जागा जिंकण्याचीही शक्यता नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केला.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये इंडिया आघाडीचा धुव्वा उडाला आहे. तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष यावेळी चार लोकसभा जागाही जिंकू शकणार नाही. उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे डुमरियागंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदंबिका पाल यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी सभा घेतली. त्यात ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो परत मिळविल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही. राहुल गांधी मतपेढीचे राजकारण करत आहेत.
‘भारत बलाढ्य अर्थव्यवस्था बनणार’
शाह यांनी सांगितले की, लष्करातील निवृत्त लोकांसाठी वन रँक वन पेन्शन ही योजना भाजप सरकारने लागू केली. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनेल.
त्यांच्याकडे उमेदवार नाही
- अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील.
- अशा पद्धतीने देशाचा कारभार चालविणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी केला. मोदी यांनी गेल्या २३ वर्षांच्या सार्वजनिक कार्यात एकही सुटी घेतली नाही.