महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार, गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:15 AM2024-08-20T11:15:54+5:302024-08-20T11:16:11+5:30
गुप्तांगात १५० ग्रॅम/मिलीग्रॅम वीर्य सापडल्याचा दावा खोटा
कोलकाता : येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, त्यानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली, असा तिच्या शवविच्छेदन अहवालाचा निष्कर्ष आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. पीडितेच्या गुप्तांगात १५० ग्रॅम/मिलीग्रॅम वीर्य सापडल्याचा करण्यात आलेला दावा या अहवालात फेटाळण्यात आला. या महिला डॉक्टरला फ्रॅक्चर झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले नाही. मात्र तिचे डोके, गाल, ओठ, नाक, हनुवटी, मान, डावा हात, डावा खांदा, डावा गुडघा व गुप्तांगाच्या अंतर्भागात जखमा आढळून आल्या आहेत.
७० डॉक्टरांनी माेदींना लिहिले पत्र
कोलकातातील सरकारी रुग्णालयात महिला डाॅक्टरवर बलात्कार व नंतर तिची झालेली हत्या या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असे पद्म पुरस्कार मिळालेल्या ७० डॉक्टरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा सुनावण्याचा निर्णय विशिष्ट मुदतीत द्या यासह पाच मागण्या या डॉक्टरांनी मोदींकडे केल्या आहेत.
हत्या झालेल्या महिला डॉक्टरची ओळख उघड करणाऱ्यास अटक
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर.जी. कार रुग्णालयात बलात्कार व त्यानंतर हत्या झालेल्या महिला डॉक्टरचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकवून तिची ओळख उघड केल्याबद्दल एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही धमक्या दिल्या होत्या. प. बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी सोमवारी देखील काम बंद आंदोलन सुरू ठेवले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध राज्यांतही डॉक्टरही आंदोलन करत आहेत.