पत्नीने घरातील कामे करावीत ही अपेक्षा करणे क्रूरता नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:44 AM2024-03-08T10:44:11+5:302024-03-08T10:47:09+5:30
पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट देण्यास कौटुंबिक न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या आदेशाविरुद्ध पुरुषाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
नवी दिल्ली : पत्नीने घरातील कामे करावीत, अशी पतीची अपेक्षा असेल तर याला क्रूरता म्हणता येणार नाही, कारण लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्याही काही जबाबदाऱ्या असतात. पतीवर आर्थिक जबाबदारी असते, तर पत्नीवर घराची जबाबदारी असते. अशा स्थितीत बायकोला घरचे काम करायला सांगणे हे मोलकरीण म्हणून काम करण्यासारखे मानले जाऊ शकत नाही, असे दिल्ली न्यायालयाने म्हटले आहे.
पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट देण्यास कौटुंबिक न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या आदेशाविरुद्ध पुरुषाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने सांगितले की, पतीने संसार वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. तिच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्थाही केली. मात्र, ती आई-वडिलांसोबत राहू लागली. पत्नीला कुटुंबासोबत राहायचे नाही. महिलेने केवळ तिच्या वैवाहिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले नाही, तर पतीला मुलांपासून दूर ठेवून मुलांच्या प्रेमापासून वंचित ठेवले.