देशात परतताना जुन्या नोटा दाखविणे बंधनकारक
By admin | Published: January 3, 2017 03:06 AM2017-01-03T03:06:21+5:302017-01-03T03:06:21+5:30
अनिवासी भारतीय आणि विदेशात गेलेल्या भारतीयांना आपल्याकडील हजार-पाचशेच्या बंद नोटा बँकांत भरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली असली
नवी दिल्ली : अनिवासी भारतीय आणि विदेशात गेलेल्या भारतीयांना आपल्याकडील हजार-पाचशेच्या बंद नोटा बँकांत भरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली असली, तरी भारतात परतताच विमानतळावर बंद नोटा त्यांना दाखवून त्यासंबंधीच्या शपथपत्रावर कस्टम अधिकाऱ्यांचा शिक्का घ्यावा लागेल, तरच त्यांना या नोटा बँकांत भरता येतील.
नोटाबंदीच्या ५0 दिवसांच्या काळात देशाबाहेर असलेल्या भारतीयांना आपल्याकडील नोटा बँकांत भरता याव्यात यासाठी ३ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. ३0 जूनपर्यंत ते आपल्याकडील नोटा बँकांत भरू शकतील. रिझर्व्ह बँकेच्या मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि नागपूर येथील शाखांत या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. भारतात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील नोटा कस्टम अधिकारी काटेकोरपणे मोजून घेतील. त्यासंबंधीच्या शपथपत्रावर शिक्का देतील. शपथपत्रावर नोटांची संख्या आणि एकूण रक्कम यांचा स्पष्ट उल्लेख असेल. शपथपत्रात नमूद रक्कमच त्यांना बँकेत जमा करता येईल. नोटाबंदीच्या काळात विदेशात असलेल्या भारतीयांना कितीही नोटा बँकेत जमा करता येतील. तथापि, अनिवासी भारतीय फक्त २५ हजार रुपयेच जमा करू शकतील. नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि बांगलादेशात राहणाऱ्या भारतीयांना ही सवलत मिळणार नाही.
विदेशात राहणाऱ्या भारतीयांना इमिग्रेशन शिक्का असलेला पासपोर्ट सादर करावा लागेल. याशिवाय आधार कार्ड अथवा अन्य केवायसी दस्तावेजही सादर करावे लागतील. ५0 दिवसांच्या काळात ते खरोखर विदेशात होते हे सिद्ध करण्यासाठी हे दस्तावेज बंधनकारक करण्यात आले आहेत. बँकेत जमा करण्यात येणाऱ्या नोटा खरोखरच त्यांच्यासोबत विदेशात होत्या, याची खातरजमा करण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत.