आरोग्य सेतू अॅप कुणी तयार केले याची माहितीच नाही ! केंद्रीय माहिती आयोगाने दिली केंद्र सरकारला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 04:28 AM2020-10-29T04:28:00+5:302020-10-29T07:42:54+5:30
Arogya Setu app News : माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने केंद्रीय माहिती आयोगाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाचे मानले गेलेले आरोग्य सेतू ॲप लाखो भारतीयांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहे. हे ॲप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी विकसित केल्याची माहिती आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी हे ॲप कुणी तयार केले याविषयी काहीही माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे.
माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने केंद्रीय माहिती आयोगाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. संबंधित विभागांच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांसह नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच एनआयसीला ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या प्रकरणात आरटीआयअंतर्गत गुन्हा का दाखल केला जाऊ नये, असा सवालही आयोगाने केला आहे.
आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावर हे अॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, खुद्द एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही, अशी विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने केली आहे.
कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत, याबद्दल माहिती दिलेली नाही. या प्रकरणाशी संबंधित विभागांना २४ नोव्हेंबर रोजी माहिती आयोगासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सौरव दास यांनी यासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार केली होती. या अॅपच्या प्रस्तावाचे मूळ, त्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेचे तपशील, या अॅपच्या निर्मितीत सहभागी असलेल्या कंपन्या, व्यक्ती, सरकारी विभाग आदींचे तपशील दास यांनी माहिती अधिकारात मागितले होते. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी त्यांना विविध विभागांकडून उत्तर मिळाले नाही.
‘’आरोग्य सेतू’’ची निर्मिती पारदर्शी
आरोग्य सेतू ॲॅप हे अतिशय पारदर्शक पद्धतीने सार्वजनिक-खासगी
भागीदारीतून अवघ्या २१ दिवसांच्या विक्रमी वेळात विकसित केले असल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने नोटीस बजावल्यानंतर केंद्राने यासंदर्भात सविस्तर खुलासा केला आहे. या ॲॅपच्या निर्मितीशी संबंधित सर्वांची नावे आधीच सार्वजनिक केलेली आहेत, याचा पुनरुच्चारही केंद्राने केला आहे.