दोेन्ही हातांत लाडू शक्यच नाही; दर कमी होतील, पण करकपात अशक्यच - धर्मेंद्र प्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 05:40 AM2017-09-24T05:40:05+5:302017-09-24T05:40:05+5:30
पेट्रोल व डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांत कमी झाल्या आहेत. त्या आणखीही कमी होतील. परंतु ‘दोनो हाथ में लड्डू नही हो सकते’, असे सांगून किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा ठेवू नये, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांत कमी झाल्या आहेत. त्या आणखीही कमी होतील. परंतु ‘दोनो हाथ में लड्डू नही हो सकते’, असे सांगून किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा ठेवू नये, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी स्पष्ट केले.
प्रधान म्हणाले की, गेली २० वर्षे देशातील पेट्रोल व डिझेलच्या किमतींची सांगड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांशी घातलेली आहे. अमेरिकेत चक्रीवादळे आल्याने मध्यंतरी किमती वाढल्या. गेल्या काही दिवसांत दर कमी झाले आहेत व ते आणखीही कमी होतील.
इंधनाचे दर आटोक्यात राहावेत यासाठी त्यावरील कर कमी केले जाणे शक्य नाही, असे सांगून ते म्हणाले की, दोन्ही हातांत लाडू मिळू शकत नाहीत, हे ग्राहकांनी समजून घ्यावे. पायाभूत सुविधा व कल्याणकारी योजना यासाठी पैसा लागतो व तो करांमधूनच मिळतो.
प्रधान म्हणाले की, लोकशाहीत जनतेकडून कराच्या रूपाने मिळालेला पैसा बव्हंशी कल्याणकारी योजनांसाठी खर्च होतो. यात लपवाछपवी काही नाही. त्यामुळे चांगले रस्ते हवे असतील, स्वच्छ पिण्याचे पाणी हवे असेल व मुलांना
चांगले शिक्षण हवे असेल तर कर देणे क्रमप्राप्त आहे. सर्व राज्यांच्या सहमतीने जीएसटी व्यवस्था लागू केली आहे. त्यामुळे राज्यांना विश्वासात घेऊन लवकरच पेट्रोलियम पदार्थही जीएसटी व्यवस्थेत आणले जातील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.