पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेशिवाय हे शक्य नाही - निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 09:33 PM2017-09-03T21:33:55+5:302017-09-03T21:34:14+5:30
पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने मला इतक्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे', अशी भावना देशाच्या नव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे
नवी दिल्ली, दि. 3 - पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने मला इतक्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे', अशी भावना देशाच्या नव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. मी भारावून विनम्र झाले आहे. ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून विश्वास दाखविल्याबद्दल मी पंतप्रधानांची ऋणी आहे. जे सतत मनात येते त्याचा मी आता देशसेवेसाठी उपयोग करू शकेन. एका लहानशा शहरातून आलेल्या आणि नेतृत्वाच्या पाठिंब्याने पक्षात विविध पदांवर काम केलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर एवढी मोठी जबाबदारी टाकली जाते तेव्हा वाटते की, खरंच ही वैश्विक कृपा आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पासून मोदीजींच्या कार्यशैलीशी मी परिचित आहे. महिलाही तेवढ्याच क्षमतेने काम करू शकता, त्यांना त्यांचा योग्य वाटा द्यायला हवा, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. असेही त्या पुढे म्हणाल्या.
शपथविधी सोहळ्यानंतर सीतारामन यांनी माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नसल्याचेही त्या म्हणाल्या. वाणिज्य मंत्रिपदावरील कारभारावर विरोधकांकडून टीका होत असल्याकडे लक्ष वेधले असता अशा टीकेने मी डगमगणार नाही. टीकेला सामोरे जाऊन त्यातून योग्य तो धडा घ्यायचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
निर्मला सितारामन यांच्या रूपाने संरक्षणमंत्री पदाला अत्यंत कार्यक्षम उत्तराधिकारी मिळाला आहे. त्या ती भूमिका समर्तपणे बजावतील, याची मला खात्री आहे. व्यापार खात्याचे काम उत्तमपणे केले म्हणून सितारामन यांच्यावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. या पदावर एक स्त्री म्हणूनही त्यांची नेमणूक लक्षणीय आहे. असे वित्तंतमंत्री अरुण जेटली म्हणाले.
आज सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करताना निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये निर्मला सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती.
निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ आँगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नँशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथे एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवी मिळवल्यावर त्यांनी प्राइसवाँटर कूपर्स आणि बीबीसीमध्ये काही काळ काम केले. निर्मला सीतारामन राष्ट्रीय महिला आयोगाच्याही सदस्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रणवा स्कूलच्या संस्थापक सदस्या आहेत. 2006 साली त्या भाजपाच्या प्रवक्तेपदी निवडल्या गेल्या. उत्तम इंग्लिश, सफाईदार मुद्दे मांडणे यामुळे त्या भाजपाची इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. २०१४ साली त्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री झाल्या. त्या सध्या कर्नाटकमधून राज्यसभेत निवडून गेल्या आहेत.