रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही - पंतप्रधान मोदी
By admin | Published: June 27, 2016 02:48 PM2016-06-27T14:48:31+5:302016-06-27T19:01:08+5:30
कोणत्याही राजकीय पक्षाने आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
राजन यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे गैर असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये होणारा सुब्रमण्यम स्वामी यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्या मुद्यावर मौन सोडत ' कुठल्याही राजकीय पक्षाकडून राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही' असे म्हटले असून सुब्रमण्यम स्वामी यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.
विदेशामधल्या काळ्या पैशांसदर्भात आम्ही प्रचंड काम केलं असल्याचं मोदी म्हणाले. 2011 ते 2014 या तीन वर्षात सुप्रीम कोर्टाने सांगूनही आधीच्या सरकारनं SIT नेमली नाही, जे काम आम्ही सरकार स्थापन केल्यावर लगेच केलं असं त्यांनी सांगितलं. आम्ही जगातल्या अनेक देशांशी काळ्या पैशांसदर्भात करार केले आहेत आणि स्वित्झर्लंड सारखा देश स्वत:हून आता आपल्याशी चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
GST बिल संमत होणं ही गरीब राज्यांची गरज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, ओरीसा अशा सगळ्या गरीब राज्यांना GST चा फायदा होणार आहे. मात्र, एका पक्षाने हे विधेयक अडवून ठेवलं आहे. मी हे विधेयक संमत होण्यासाठी प्रयत्न करत राहणार. त्यासाठी गरज पडली तर कुणाच्या घरी चहा प्यायलाही मी जायला तयार आहे असं मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, विकास हाच आमचा मंत्र आहे. कुठलीही भडकाऊ भाषणं देणं योग्य नसल्याचं सांगतना मोदींनी अशा लोकांना हीरो करू नका असा सल्ला मोदींनी दिला.