मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी नेमणे घटनाबाह्य नाही पण...

By admin | Published: December 18, 2015 01:59 AM2015-12-18T01:59:46+5:302015-12-18T01:59:46+5:30

हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही. मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक

It is not uncommon for the post of Brahmin priest in the temple ... | मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी नेमणे घटनाबाह्य नाही पण...

मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी नेमणे घटनाबाह्य नाही पण...

Next

नवी दिल्ली : हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही. मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक पंथाने स्थापन केलेले असेल व त्या मंदिरातील पूजाविधी एका विशिष्ट गोत्राच्या व्यक्तीने करण्याची परंपरा धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेली असेल तर अशा मंदिरात त्याच गोत्राचा पुजारी नेमावा लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने म्हटले की, भारतीय राज्यघटनेने धर्म, वर्ण, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव करणे निषिद्ध ठरविले आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचेही स्वातंत्र्य दिलेले आहे. धर्माचरणाचे हे स्वातंत्र्य केवळ धर्मतत्वे आणि श्रद्धेपुरते मर्यादित नाही. तर त्यात त्या धर्मश्रद्धेनुसार केल्या जाणाऱ्या विधी व कर्मकांडांनाही लागू होते.
न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेने समानता आणि समान संधीचे तत्व स्वीकारले आहे. तरीही मंदिर ज्या पंथाचे असेल त्या पंथाच्या रुढी-परंपरांनुसारच तेथील पूजा-अर्चा होणे हा त्या पंथाच्या लोकांच्या धर्माचरणाच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा मंदिरातील पुजाऱ्याची नेमणूक करताना काहींचा, धर्म, वर्ण अथवा जातीच्या आधारावर नव्हे, तर ती व्यक्ती त्या पंथाची नाही म्हणून विचार न केला जाणे समानता व समान संधीच्या तत्वाचे उल्लंघन ठरत नाही. थोडक्यात शैवपंथीय मंदिरात वैष्णव पंथाची व वैष्णव पंथीय मंदिरात शैव पंथीय व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक केली जाऊ शकत नाही.
तमिळनाडूतील मंदिरांमधील पुजाऱ्यांच्या नेमणुकांसंबंधीच्या एका प्रकरणात न्या. रंजन गोगोई व न्या. एन.व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्यातील मंदिरांत, एरवी पात्रता निकषांत बसणाऱ्या व सुयोग्य प्रशिक्षण घेतलेल्या कोणाही हिंदू व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक करण्याची तरतूद करणारा शासन निर्णय मे २००६ मध्ये जारी केला होता. मदुराई येथील श्री मीनाक्षी मंदिरातील काही पुजाऱ्यांनी (अर्चक) आणि पुजाऱ्यांच्या संघटनेने त्यास आव्हान दिले होते.
न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्य व अन्य मुलभूत हक्कांसंबंधीच्या तरतुदी आणि त्यासंदर्भात पूर्वी दिल्या गेलेल्या अनेक न्यायनिर्णयांचे सविस्तर विवेचन केले व असे म्हटले की, सरकारचा निर्णय ठोबळमानाने घटनाबाह्य ठरत नाही. मात्र त्यानुसार केल्या जाणाऱ्या पुजाऱ्यांच्या नेमणुका मात्र धार्मिक स्वातंत्र्याच्या निकशावर तपासल्या जाऊ शकतील. (विशेष प्रतिनिधी)

बडव्यांचे काय होणार?
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातही बडव्यांचे पूर्वापार चालत आलेली मक्तेदारी मोडीत काढत मंदिर समितीने इतरांची पुजारी म्हणून नेमणूक केली आहे. बडव्यांना याविरुद्ध न्यायालयीन लढा देऊन तो जिंकायचा असेल तर त्यांनाही पंढरपूरचे मंदिर हे एका ठराविक धर्म पंथाचे मंदिर आहे आणि या मंदिरात ठराविक घराण्यांतील व्यक्तींचीच पुजारी म्हणून नेमणूक करण्याची पूर्वापार चालत आलेली शास्त्राधारित परंपरा आहे, हे सप्रमाण सिद्ध करावे लागेल.

Web Title: It is not uncommon for the post of Brahmin priest in the temple ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.