अभिनेता, कुलगुरू तथा मंत्र्यावर आयटीचे छापे

By admin | Published: April 8, 2017 12:19 AM2017-04-08T00:19:05+5:302017-04-08T00:19:05+5:30

एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गीतालक्ष्मी यांच्यासह इतरांवर एकाचवेळी धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे.

IT raid for actor, vice chancellor and minister | अभिनेता, कुलगुरू तथा मंत्र्यावर आयटीचे छापे

अभिनेता, कुलगुरू तथा मंत्र्यावर आयटीचे छापे

Next


चेन्नई : करचुकवेगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तामिळनाडूनचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर, अभिनेता शरदकुमार, माजी खासदार सी. राजेंद्रन आणि एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गीतालक्ष्मी यांच्यासह इतरांवर एकाचवेळी धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. आर.के. नगर विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या आधीच चेन्नई, पुडुक्कोट्टई आणि तिरुचिराप्पली आणि नमक्कलसह एकूण ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.
शंभर अधिकाऱ्यांसह पोलीस व निमलष्कर दलाचे सुरक्षा जवान या धाडसत्रात सहभागी असून, राज्यातील वैद्यकीय विद्यापीठ, वैद्यकीय व्यावसायिक आणि औषधी कंपन्या व या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर धाडसत्र चालू आहे. एका आमदारावरही धाड टाकण्यात आली आहे.
आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जात असल्याचा सुगावा लागल्याने आणि सत्ताधारी अम्मा गटाच्या अद्रमुक गटातर्फे धनाच्या राशी ओतल्या जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत प्राप्तिकर अधिकाऱ्याने हे धाडसत्र हाती घेतले आहे, असे सूत्रांनी सांगितले. ही पोटनिवडणूक अद्रमुकच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची केलीआहे. अद्रमुक अम्मा गटाने टी.टी.व्ही. दिनकरन यांना मैदानात उतरविले आहे. (वृत्तसंस्था)
>भाजपवर टीका
आम्हाला धाकदपटशा दाखविण्यासाठी भाजपाच्या इशाऱ्याबरहुकूम आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांच्यावर धाड टाकण्यात आल्याचा आरोप अद्रमुक अम्मा गटाने केला आहे. प्राप्तिकर विभाग आमची वाट्टेल तेथे झाडाझडती घेत आहे. माझ्या स्नानगृहाचीही त्यांनी झडती घेतली; परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. माझ्या मुलांना शाळेतही जाऊ दिले नाही, असा आरोप सी. विजयभास्कर यांनी केला आहे.
ही तर धमकावणीच
अद्रमुक अम्मा गटाला धमकावत आमच्याबद्दल लोकांत भीती निर्माण करण्याच्या उद्देशानेच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच यामागे आहे, असा आरोप खासदार एस.आर. बालासुब्रमणियन यांनी केला आहे. सम्मुथुवा मक्कल कची पक्षाचे नेते व अभिनेता शरथकुमार यांच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी या पोटनिवडणुकीत दिनकरन यांना पाठिंबा दिलेला आहे.

Web Title: IT raid for actor, vice chancellor and minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.