IT Raid: सपा आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाची धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:33 AM2021-12-31T10:33:03+5:302021-12-31T10:37:52+5:30
अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्यावरील कारवाईदरम्यान पुष्पराज जैन यांचे नाव समोर आले होते. पीयूष आणि पुष्पराज यांचे अडनाव जैन आहे, तसेच त्यांचा व्यवसाय एकच असून, त्यांचे घरही एकाच गल्लीत आहे.
कन्नौज :उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आयकर पथकाने (IT Department) समाजवादी पार्टीचे विधान परिषदेचे आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन (Pushpraj Jain) यांच्या ठिकाणांवर धाड टाकली आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील पुष्पराज जैन यांच्या घरावर आणि कारखान्यावर छापे टाकण्यात येत आहेत. पीयूष जैन प्रकरणात पुष्पराज यांचे नाव समोर आले होते. पुष्पराज जैन यांनी समाजवादी अत्तर नावाने अत्तर लॉन्च केले होते.
50 ठिकाणांवर छापे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्कम टॅक्सच्या मुंबई युनिटने(IT Raid) ही शोध मोहीम हाती घेतली आहे. सध्या आयटीचे सदस्य कारखान्यात व घरी उपस्थित आहेत. सदर कोतवाली परिसरातील छुपत्ती येथे पुष्पराज जैन यांचे घर आहे. याशिवाय डीजीजीआयची टीम कन्नौजमध्येच उत्तर व्यावसायिक मलिक मियाँ यांच्या घरावर छापा टाकत आहे. कन्नौज, नोएडा आणि कानपूरसह उत्तर प्रदेशातील सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
IT Dept conducting searches at perfume businessman Pushpraj Jain 'Pampi' & one more perfume company on intelligence of tax evasion. Searches underway since early morning today at 8 premises including Kanpur, Kannauj, Bombay, Surat, Dindigul (TN). More details awaited: Sources
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 31, 2021
मुंबईतही कार्यालय
अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यादरम्यान पुष्पराज जैन चर्चेत आले होते. पीयूष जैन यांच्यासोबत पुष्पराज जैन यांचे नाव पुढे आले तेव्हा त्यांनी स्वतःच पीयूष जैनशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. दोघांचे नाव येण्याचे कारण म्हणजे दोघांचे आडनाव जैन आहे, शिवाय दोघांचा व्यवसायही एकच आहे आणि दोघांचे घर एकाच गल्लीत आहे. पुष्पराज जैन यांचे विभागीय कार्यालय मुंबईत असून, अत्तराचा व्यवसाय मध्यपूर्वेतील देशांमध्ये पसरलेला आहे.
कोण आहेत पुष्पराज जैन?
2016 मध्ये पुष्पराज जैन इटावा-फर्रुखाबाद येथून विधान परिषदेवर निवडून आले. ते प्रगती अरोमा ऑइल डिस्टिलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह-मालक आहेत. 1950 मध्ये त्यांचे वडील सावलाल जैन यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला होता. पुष्पराज आणि त्यांचे तीन भाऊ कन्नौजमध्ये व्यवसाय करतात आणि एकाच घरात राहतात. पुष्पराज यांचे मुंबईतही घर आणि कार्यालय आहे, तेथून ते मुख्यतः मध्य पूर्वेतील जवळपास 12 देशांमध्ये निर्यातीचे व्यवहार करतात. त्यांच्या तीन भावांपैकी दोन भाऊ मुंबईच्या ऑफिसमध्ये काम करतात तर तिसरा त्याच्यासोबत कन्नौजमध्ये एका मॅन्युफॅक्चरिंग सेटअपवर काम करतो.
पुष्पराज जैन यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
2016 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पुष्पराज आणि त्यांच्या कुटुंबाकडे 37.15 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 10.10 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्यांनी कन्नौजमधील स्वरुप नारायण इंटरमीडिएट कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. शुक्रवारी छापे सुरू झाल्यानंतर पुष्पराज यांनी पीयूष जैन यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगितले होते.
अखिलेश कनौजमध्येच
सपाचे नेते पुष्पराज जैन यांच्या घरावर आयटी छापा अशा वेळी पडत आहे, जेव्हा सपा प्रमुख अखिलेश यादव स्वतः उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये उपस्थित आहेत. पुष्पराज जैन यांच्या मुद्द्यावर आज अखिलेश यादव दुपारी बाराच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार होते, मात्र आता शोधमोहिमेनंतर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.