आयटी क्षेत्राच्या महसुलातील वाढ होऊ शकेल दोन अंकी - अजीम प्रेमजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:41 AM2021-07-08T10:41:04+5:302021-07-08T10:43:43+5:30
चालू वित्त वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वृद्धीदर दोन अंकी झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. साथीच्या काळातही हे क्षेत्र २ ते ३ टक्क्यांनी वाढले. वित्त वर्ष २०२१ मध्ये या क्षेत्राने शुद्ध स्वरूपात १.५८ लाख नव्या नोकऱ्या दिल्या.
बंगळुरू : भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा महसूल चालू वित्त वर्षात वाढून दोन अंकी होईल, असे प्रतिपादन विप्रोचे संस्थापक-चेअरमन अजीम प्रेमजी यांनी केले आहे. ‘बॉम्बे चार्टर्ड अकाऊंटंट्स सोसायटी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रेमजी यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात माहिती तंत्रज्ञान उद्योगाने जग धावते ठेवले. या उद्योगाने स्वत:ही नवे बदल स्वीकारले. त्यामुळे या क्षेत्रातील वृद्धीची गती जबरदस्त आहे.
चालू वित्त वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वृद्धीदर दोन अंकी झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. साथीच्या काळातही हे क्षेत्र २ ते ३ टक्क्यांनी वाढले. वित्त वर्ष २०२१ मध्ये या क्षेत्राने शुद्ध स्वरूपात १.५८ लाख नव्या नोकऱ्या दिल्या.
प्रेमजी म्हणाले की, आयटी क्षेत्राने साथ काळात स्वत:मध्ये आवश्यकतेनुसार बदल घडविले. ‘वर्क फ्रॉम होम’ स्वीकारले गेले. आजही ९० टक्के कर्मचारी घरून काम करीत आहेत. काही प्रमाणात कार्यालयांतून, तर काही प्रमाणात घरून काम करण्याच्या हायब्रीड पद्धतीचाही सोयीनुसार वापर केला जात आहे. हे भविष्यातील कार्य मॉडेल म्हणून कायम होऊ शकते.
शिक्षकांचे लसीकरण करून शाळा सुरू करा
अजीम प्रेमजी यांनी सांगितले की, देशातील सर्व शिक्षकांचे लसीकरण करून शाळा लवकरात सुरू करायला हव्यात. मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे मुलांचे प्रचंड नुकसान होत असून, त्याकडे दुर्लक्ष करणे मोठी चूक ठरेल. मुलांना पुढच्या वर्षात ढकलून तुम्ही त्यांच्यात शिक्षणाची मोठी तूट निर्माण करीत आहात. ती कधीच भरून निघणार नाही.