उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर जाणं धक्कादायक : शक्तिकांत दास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:27 PM2019-09-16T22:27:14+5:302019-09-16T22:37:52+5:30
भारताचा एकूण उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर जाणं हा माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली: भारताचा एकूण उत्पन्नाचा दर (जीडीपी) पाच टक्क्यांवर जाणं हे माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे देशाचा आर्थिक दर सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्याने अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
शक्तिकांत दास यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणुकीचा दर मागच्या वर्षाच्या तुलनेत चांगला असून खाद्यपदार्थांची महागाई देखील येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल. तसेच केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्याने देशाचा आर्थिक विकास दर सुधारेल असं त्यांनी स्पष्ट केले. उत्पन्नाचा दर 5.5 टक्के येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. तर आरबीआयला जीडीपीचा दर 5.8 टक्के किंवा 5.9 टक्के येईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र 5 टक्के जीडीपी दर ही धक्कादायक बाब होती” असंही दास यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
तसेच डाळी आणि भाज्यांच्या किंमती अपेक्षेप्रमाणे असून काही उत्पादनांच्या वाढलेल्या किंमती ग्रामीण भागाच्या आर्थिक वाढीसाठी चांगल्याच आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे अंडी आणि दुधाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा शहरांवर परिणाम होतो, असंही ते म्हणाले. सौदी अरमको कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे परिणाम पूर्ण जगावर होणार आहे. तसेच भारतावर याचा कसा परिणाम होईल हे समजण्यासाठी थोडा कालावधी लागेल असं देखील शक्तिकांत दास यांनी सांगितले.