"बुलडोजर चालवायला दम लागतो", योगी आदित्यनाथ-अखिलेश यादव भिडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:16 PM2024-09-04T12:16:44+5:302024-09-04T12:19:12+5:30
Yogi Adityanath Akhilesh Yadav bulldozer action : उत्तर प्रदेशात सध्या 'बुलडोजर राजकारण' रंगले आहे. २०२७ नंतर बुलडोजर गोरखपूरच्या दिशेने असतील या अखिलेश यादव यांनी केलेल्या विधानानंतर योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे.
Bulldozer Politics : २०१७ पासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात बुलडोजर महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. बुलडोजर कारवाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, आता यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादवांमध्ये वार-पलटवार सुरू झाले आहेत.
लखनौमध्ये नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले.
२०२७ नंतर बुलडोजर गोरखपूरच्या दिशेने असतील, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केले. त्याच्या टीकेनंतर योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला. काही लोकांना फक्त स्वप्न बघण्याची सवय असते. बुलडोजर चालवण्यासाठी दम लागतो, असा पलटवार योगी आदित्यनाथांनी केला.
'बुलडोजर'वरून योगी आदित्यनाथ यादवांना काय म्हणाले?
अखिलेश यादव यांनी गोरखपूरबद्दल केलेल्या विधानाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "बुलडोजर चालवण्यासाठी दम लागतो. बुलडोजर चालवण्यासाठी मन आणि डोकं असायला हवे. बुलडोजर सगळ्यांच्याच हातात बसत नाही."
"२०१७ पूर्वीच्या उत्तर प्रदेशात लूट माजली होती. पूर्वी नोकरीच्या नावावर वसुली केली जायची. काही लोकांना फक्त स्वप्न बघण्याची सवय होती. ते फक्त सरकार बनवण्याचे स्वप्न बघू शकतात. गुन्हेगार आणि माफियांच्या समोर नाक घासणारे बुलडोजर काय चालवतील? हे लोक दंगलखोरांसमोर नाक घासतात", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
अखिलेश यादव बुलडोजर मुद्द्यावरून काय म्हणाले?
"२०२७ नंतर गोरखपूरच्या दिशेने बुलडोजरची तोंडे असतील. सरकार बनवल्यानंतर बुलडोजरची दिशा बदलेल", असे अखिलेश यादव म्हणाले होते. ते गोरखपूरमध्ये पक्षाच्या बैठकीत बोलले होते.
योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून उत्तर प्रदेशात गुन्हेगार आणि माफियांविरोधात बुलडोजर कारवाई केली जात आहे. बुलडोजर बाबा असेही योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात म्हटले जाते.