इटालियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारणार २ पूल; भूकंपापासून होणार संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:59 AM2022-09-15T11:59:55+5:302022-09-15T12:00:06+5:30
भारतामध्ये प्रथमच ह्या इटालियन प्रणालीचा वापर ह्या दोन ब्रिजमध्ये होणार आहे.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये बांधल्या जाणाऱ्या कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या १६ ब्रिजपैकी दोन ब्रिजमध्ये प्रथमच प्री-लोडेड स्प्रिंग डॅम्पर्स (PSDs) बसविले जाणार आहेत. ह्या प्री-लोडेड स्प्रिंग डॅम्पर्समुळे भूकंप प्रतिरोधक ब्रिज आणि ब्रिजची संरचना सुरक्षित करण्यासाठी मदत होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रणालीचा वापर ब्रिज बांधण्यासाठी केला जाणार आहे.
जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकप्लाचे काम सुरु आहे. त्या प्रकल्पातील १६ ब्रिज बांधण्याचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करत आहे. ते रियासी, बक्कल, कौरी आणि सांगलदान मधून जाणार्या ६६-किमी मार्गावरती हे पूल आहेत. त्या १६ ब्रिजपैकी दोन ब्रिज - ब्रिज नं ३९ आणि ब्रिज नं ४३ - मध्ये प्री-लोडेड स्प्रिंग डॅम्पर्स बसविले जाणार आहेत.
भारतात प्रथमच नाविन्यपूर्ण प्रणाली
१६ केआरसीएल (KRCL) ब्रिजचे प्रकल्प व्यवस्थापक अलिमिल्ला सागर यांनी सांगितले की, ब्रिज ३९ मध्ये दहा पीएसडीस (PSDs) तर ब्रिज ४३ मध्ये(जो चेनाब रेल्वे ब्रिजला जोडतो) मध्ये सहा पीएसडीस (PSDs) चा वापर केला जाणार आहे. प्री-लोडेड स्प्रिंग डॅम्पर (PSD) हे भूकंपाच्या वेळी संरचनेच्या काही भागांमध्ये उद्भवणाऱ्या हालचाली मर्यादित करण्यासाठी तसेच रोखण्यासाठी आणि संरचनांमधील भूकंपाच्या भाराचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. पुलांवर ते थेट ब्रिज डेक (deck) आणि पियर्स (piers) दरम्यान बसविले जातात. पीएसडीस (PSDs) विशेषतः पुल ३९ आणि 43 साठी आवश्यक आहेत. कारण दोन्ही ब्रिज रियासी जिल्ह्यात आहेत जे भूकंपप्रवण झोन-पाच (Zone-V) मध्ये येतात आणि कोणताही भूकंपाचा धक्का त्याठिकाणी जास्तीत जास्त प्रभाव टाकू शकते असे सागर यांनी सांगितले.
पीएसडीस इटलीमधून आयात करणार
पीएसडीस (PSDs) हे इटलीमधून बॅचेस मध्ये आयात केले जात आहेत. त्याच इंस्टॉलेशन ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची आणि डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पीएसडीस (PSDs) मुख्य स्पॅन आणि दोन प्लॅटफॉर्म स्पॅन मध्ये बसविले जाणार आहे. पीएसडीस (PSDs) साठी लागणारे इतर साहित्य आधीच इटलीहून आले आहे, असेही सागर यांनी सांगितले. १६ पुलांचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
प्रमुख ठळक मुद्दे
- एकूण २.३ किमी लांबीचे १६ केआरसीएल (KRCL) ब्रिज
- ब्रिज ३९ मध्ये ७ पिलर्स आहेत, ज्यातील सर्वात उंच पिलर १०३M चा आहे जो कुतुबमिनारपेक्षा जवळजवळ ३०M उंच आहे
- प्रकल्पात एकूण १६,७१,९४३ क्युबिक मीटरचे उत्खनन
- २६,१६०MT स्ट्रक्चरल स्टीलचा एकूण बांधकामासाठी वापर
- प्रकल्पात एकूण ६३,१६४MT सिमेंटचा वापर