आयटीबीपी कोरोना केंद्र: तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस काउन्सिलर; जाणून घ्या, नेमके काय करतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:38 AM2021-05-13T07:38:26+5:302021-05-13T07:41:34+5:30
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता येथे रुग्णांना कोणत्याही अडथळ्याविना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. छतरपूर भागात २६ एप्रिलपासून ५०० बेडचे सरदार पटेल कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीत भारत-तिबेट सीमा पोलीसद्वारा (आयटीबीपी) संचलित कोरोना केंद्रात रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांचा तणाव दूर करण्यासाठी किमान ३० स्ट्रेस काउन्सिलरची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता येथे रुग्णांना कोणत्याही अडथळ्याविना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. छतरपूर भागात २६ एप्रिलपासून ५०० बेडचे सरदार पटेल कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे ३५७ रुग्ण आहेत व येथील सर्व परिस्थिती सध्या अनुकूल आहेत. तणाव दूर करण्यासाठी पीपीई किट परिधान केलेले स्ट्रेस काउन्सिलर संपूर्ण परिसराची पाहणी करतात व दररोज सकाळी रुग्णांशी चर्चा करतात.
आयटीबीपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्येष्ठ मनोवैज्ञानिक डॉ.प्रशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ३० जणांचे पथक रुग्णांचा तणाव कमी करण्यासाठी काम करीत आहे. या केंद्रात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे दोन आठवड्यांपर्यंत त्या रुग्णांना भर्ती केलेले नव्हते. मात्र, आता ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या केंद्रात आजवर १,०८९ रुग्ण आले होते. त्यातील ६४८ रुग्णांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. ८४ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या एका पथकाने बुधवारी कोरोना केंद्राचा दौरा केला.
तणाव दूर करण्यासाठी नेमके काय करतात?
- सीमा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयटीबीपी हे बहुधा असे एकमेव सुरक्षा दल आहे, ज्याच्याकडे स्वत:चे स्ट्रेस काउन्सिलर आहेत.
- ते राष्ट्रीय मानसिक आरोग्य व स्नायू विज्ञान संस्थान (निमहंस), बंगळुरूमधून प्रशिक्षित होऊन आलेले आहेत.
- ते एरव्ही नियमितरीत्या जवानांशी चर्चा करतात. सध्या ते कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा तणाव, भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- काही वयोवृद्ध किंवा कमजोर रुग्णांना केंद्रात देखभाल करण्यासाठी नातेवाईक ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. हे स्ट्रेस काउन्सिलर त्यांच्याशीही अनेक विषयांवर चर्चा करतात.
- स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे, मनातून भीती दूर ठेवणे, अस्वस्थता दूर करणे, एवढेच नव्हे, तर जागतिक स्तरावर कोरोनाशी निपटण्यासाठी काय करावे लागेल, अशा विषयांवरही चर्चा करतात.
- काही निश्चित कालावधीनंतर योग प्रशिक्षक एका मोठ्या हॉलमध्ये रुग्णांकडून योग करवून घेतात.