आयटीसी चेअरमन वाय. सी. देवेश्वर काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 05:40 AM2019-05-12T05:40:38+5:302019-05-12T05:41:35+5:30
प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुरुवातीला मुख्यत: सिगारेट उत्पादन क्षेत्रात असलेल्या आयटीसीने देवेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एफएमसीजी, आतिथ्य, आयटी आणि इतर अनेक क्षेत्रात यशस्वी झेप घेतली.
७२ वर्षीय देवेश्वर हे २०१७ मध्येच कंपनीच्या सक्रिय चेअरमन व सीईओपदावरून पायउतार झाले होते. तथापि, अ-कार्यकारी चेअरमन म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत संचालक मंडळावर होते. गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेश्वर यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
आयटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी सांगितले की, ‘आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांच्या निधनाबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करीत आहोत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनी भरभराटीला आली. त्यांचे व्यावसायिक मॉडेल आज ६ दशलक्ष लोकांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे.’
देवेश्वर यांनी १९६८ मध्ये आयटीसीमध्ये प्रवेश केला होता. ११ एप्रिल १९८४ रोजी त्यांना संचालक मंडळावर घेण्यात आले. १ जानेवारी १९९६ रोजी ते कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि चेअरमन बनले. उद्योगजगतातील दीर्घकाळपर्यंत सर्वोच्च कार्यकारी पदावर काम करणाऱ्या मोजक्या लोकांत त्यांचा समावेश होतो. आयटीसी ही मुख्यत: सिगारेटचे उत्पादन करीत असे. देवेश्वर यांनी कंपनीला एफएमसीजी, आतिथ्य, कागद, कृषी आणि माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात उतरवून यशस्वीही केले.
देवेश्वर यांनी कंपनीचा ताबा घेतला, तेव्हा कंपनीचा महसूल ५,२०० कोटींपेक्षही कमी होता, तर करपूर्व नफा अवघा ४५२ कोटी रुपये होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनी भरभराटीला आली. २०१७-१८ मध्ये कंपनीचा महसूल ४४,३२९.७७ कोटी आणि शुद्ध नफा ११,२२३.२५ कोटी रुपयांवर गेला.