‘आयटीआय’ला मिळणार बारावीची समकक्षता ?
By admin | Published: March 9, 2016 06:18 AM2016-03-09T06:18:54+5:302016-03-09T06:18:54+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणातील इयत्ता १२वीशी समकक्षता देण्यावर केंद्र सरकार सध्या विचार करीत आहे.
नवी दिल्ली : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणातील इयत्ता १२वीशी समकक्षता देण्यावर केंद्र सरकार सध्या विचार करीत आहे.
असे झाले, तर ‘आयटीआय’मधील शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी महाविद्यालये अथवा विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरतील. मात्र, यासाठी दोन्ही अभ्यासक्रमांमधील तफावत भरून काढण्यासाठी कदाचित अशा विद्यार्थ्यांना एखादा पुरवणी अभ्यासक्रमही (ब्रिज कोर्स) करावा लागू शकेल. सूत्रांनुसार, कौशल्यविकास आणि उद्योजकता विकास मंत्रालयाने अशा आशयाचा प्रस्ताव मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविला असून, त्यावर कौशल्य विकास कार्यक्रमाशी संबंधित इतर मंत्रालयांचीही मते घेण्यात येत आहेत.
‘आयटीआय’ कौशल्यविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. या मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना जाता यावे, यासाठी ‘आयटीआय’चा अभ्यासक्रम इयत्ता १२ वीशी समकक्ष मानला जावा, असे आम्हाला वाटते. आम्ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासही (सीबीएसई) तसे सांगितले आहे.
या प्रस्तावावर शिक्षण मंडळांसह इतर सर्व संबंधितांशी व्यापक विचारविनिमय व्हायला हवा, असे मानव संसाधन विकास मंत्रालयास वाटते. हा प्रस्ताव प्रत्यक्षात कसा आणता येईल, याच्या औपचारिकता ठरविण्यासाठी मानव संसाधन व कौशल्यविकास या मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांचा एक कार्यगट स्थापन करण्यात आला असून, लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी त्या राज्यापुरता ‘आयटीआय’ अभ्यासक्रम इयत्ता १२ वीला समकक्ष करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनांमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकले होते.
देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये व आयआयटी आणि एनआयटी यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असून, सरकारी व खासगी संस्थांमधील अभियांत्रिकी पदवीच्या सुमारे आठ लाख जागा सध्या विद्यार्थ्यांअभावी रिकाम्या राहात आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणानंतर कौशल्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आयटीआयना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)