करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:01 PM2020-07-04T13:01:44+5:302020-07-04T13:14:02+5:30
कोरोना संकटात आयकर विभागाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली: कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आयकर भरणा करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आयकर भरता येईल. याआधी आयकर भरण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयकर विभागानं दिली. यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल, अशी आशा विभागाकडून व्यक्त करण्यात आली. याआधी गुरुवारी आयकर विभागानं आर्थिक वर्ष २०१९-२० साठी कर बचत गुंतवणुकीची तारीख ३१ जुलै केली होती. त्यामुळे आर्थिक वर्ष ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आलं. आयकर विभागानं घेतलेल्या नव्या निर्णयामुळे करदाते ३१ जुलैपर्यंत गुंतवणूक करून ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरू शकतात.
Understanding & keeping in mind the times that we are in, we have further extended deadlines. Now, filing of ITR for FY 2019-20 is extended to 30th Nov, 2020. We do hope this helps you plan things better.#ITDateExtension#FacilitationDuringCovid#WeCare#IndiaFightsCoronapic.twitter.com/ZoGBpok3V7
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 4, 2020
आयकरात सूट मिळवण्यासाठी करदाते जीवन विमा, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ईएलएसएस) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. आयकर विभागानं आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचं टीडीएस/टीसीएस स्टेटमेंट पूर्ण करण्यासदेखील मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता टीडीएस/टीसीएस स्टेटमेंट १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येऊ शकेल.