म्हणे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त 60 मिनिटांत
By admin | Published: March 1, 2017 10:19 AM2017-03-01T10:19:08+5:302017-03-01T13:06:56+5:30
जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल असा दावा केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - दिल्लीहून मुंबईचा प्रवास फक्त 60 मिनिटांत आणि मुंबई ते चेन्नई प्रवास 30 मिनिटांत पुर्ण होऊ शकतो का ? तसं पाहायला गेलं तर विमानालाही यापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका अशा टेक्नॉलॉजीवर चर्चा केली आहे ज्यामुळे हे सत्यात उतरु शकतं आणि तुम्ही बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने प्रवास करु शकता. अमेरिकेतील कंपनी 'हायपरलूप वन' भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांनी दावा केला आहे की चुंबकीय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान आणि प्रवाशांना अत्यंत वेगाने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवलं जाऊ शकतं.
हायपरलूप बनवण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपनीने भारतात पाच मार्ग सुचवले आहेत. यामध्ये बंगळुरू ते चेन्नई, बंगळुरू ते तिरुवअनंतपुरम, मुंबई ते चेन्नई आणि बंगळुरू ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे.
जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने ‘भारतासाठी हायपरलूप वन व्हिजन’ या संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. संमेलनात सादरीकरणावेळी कंपनीने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल, असा दावा केला.
'अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत', असं सुरेश प्रभू यांनी कार्यक्रम संपल्यानंतर सांगितलं आहे. 'मुंबई ते दिल्ली 60 मिनिटं आणि चेन्नई ते मुंबई फक्त 30 मिनिटांत प्रवास करण्याबाबत विचार केला जात आहे. भारतीय रेल्वे आधुनिकीकरण आणि वेग वाढवण्यावर जोर देत आहे. वेगावर आमचं मुख्य लक्ष असून तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत', असं सुरेश प्रभू बोलले आहेत.