इसिसचे जाळे उद्ध्वस्त!
By admin | Published: January 23, 2016 04:17 AM2016-01-23T04:17:21+5:302016-01-23T04:17:21+5:30
देशभर होणारे प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम उधळून आणण्यासाठी अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता पाहता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी विविध राज्यांतील पोलीस
नवी दिल्ली : देशभर होणारे प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम उधळून आणण्यासाठी अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता पाहता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी विविध राज्यांतील पोलीस, एटीएस आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या मदतीने देशव्यापी मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच दिवशी ठाण्याच्या मुंब्रा भागातून इसिस समर्थकांचा म्होरका मुदब्बीर शेख उर्फ आमिर याला तर मुंबईच्या माझगाव भागातून खान महम्मद हुसेन या ३६ वर्षीय व्यावसायिकाला अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे विविध राज्यांतील १४ इसिस समर्थकांना आणि कर्नाटकमध्ये अल-कायदाशी संबंधित सहा संशयितांच्या मुसक्या बांधण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान दिल्ली, पंजाब, मुंबईसह देशव्यापी अलर्ट जारी केला
आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि उत्तर प्रदेशासह सात राज्यांमध्ये एकाचवेळी मारण्यात
आलेल्या छाप्यांत ‘जानूद-उल- खलिफा-ए- हिंद’ या दहशतवादी गटाच्या १४ समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. इसिससारख्याच कडव्या भूमिकेमुळे या संघटनेने दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुंब्रा येथे वास्तव्याला असलेल्या मुदब्बीर शेख याला अटक करण्यात आली असून त्याचे यापूर्वी इंडियन मुजाहिदीनशी संबंध राहिल्याची माहिती मिळाली आहे. विदेशी नागरिकांवर हल्ले करण्यासह देशातील महत्त्वपूर्ण संस्था बॉम्बस्फोटाने उडविण्याची जबाबदारी या संघटनेकडे सोपविण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
विविध राज्यांमधील पोलीस दलांशी समन्वय राखत छाप्यांची मोहीम पार पाडण्यात आली. या सर्व १४ जणांना दिल्लीत चौकशीसाठी आणण्यात येत आहे. या गटाची पद्धतशीर रचना तयार असल्याची बाब सखोल प्राथमिक चौकशीत उघड झाली. नव्यानेच स्थापन झालेल्या या गटाला हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. युसूफच्या खात्यात ६ लाख रुपये आॅनलाईन जमा तर आणखी एका जणाकडे १ कोटी रुपयांचे विदेशी चलन आढळून आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
(लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)
कर्नाटकमध्ये अल-कायदाशी संबंधित सहा जणांना अटक करण्यात आल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी सांगितले.
अल-कायदाशी संबंध असल्याच्या संशयावरून मदरशातील एका शिक्षकाला अटक
करण्यात आल्यानंतर अटकसत्र पार
पाडण्यात आले.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस ओलांद हे भारतभेटीवर येणार असतानाच बेंगळुरू येथील फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासाला धमकीपत्र मिळाल्यानंतर कारवाईला वेग देण्यात आला. या संशयितांकडून माहिती मिळविणे सुरू असल्याचे परमेश्वरा यांनी नमूद केले.
टॅक्सीचालकाचा मृतदेह आढळल्यामुळे अलर्ट
पठाणकोट येथून तिघांनी भाड्याने घेतलेल्या टॅक्सीच्या चालकाचा मृतदेह हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्णातील काल्टा ब्रीज येथे २० जानेवारीला आढळल्यामुळे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे. पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यानंतर तिघांनी विजयकुमार याची आल्टो कार भाड्याने घेतली होती. तो कांगडा जिल्ह्णातील गग्गाल येथील रहिवासी आहे. कार अद्याप सापडली नसल्यामुळे आम्ही सतर्कतेचा आदेश दिला असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.