ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:42 AM2021-10-07T11:42:35+5:302021-10-07T11:43:52+5:30
सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे.
गुवाहटी - भंडारी दास ही महिला जवळपास 1967 मध्ये बांग्लादेशहून आपल्या पती आणि दोन मुलांसह भारतात आली. तत्कालीन परिस्थितीत धार्मिक हिंसाचारात झालेल्या वाताहतीतून बचाव करण्यासाठी हे कुटुंब भारतात आलं. तेव्हापासून आसामच्या कछार जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात भंडारी दास या आपल्या कुटुंबासमेवत राहत आहेत. मात्र, 54 वर्षांनंतरही 80 वर्षीय भंडारी दास आणि त्यांच्या कुटुंबीयांस विदेशी मानले जात आहे.
सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. तर, भारतीय नागरिक बनण्यासाठी आणखी 10 वर्षे वाट पाहावी लागेल. पण, माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी कधी भारतीय नागरिक बनेल, असे मला वाटत नाही, असे भंडारी यांनी म्हटलं आहे. विधवा असलेल्या भंडारी यांचं वय 80 वर्षे असून त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत.
सिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत. आसाम कराराच्या अनुच्छेद 5 अनुसार वाहणारे विदेशी किंवा आलेले विदेशी, ज्यांनी 1 जानेवारी 1966 आणि 24 मार्च 1971 च्या दरम्यान भारतात प्रवेश केला आहे. या विदेशी नागरिकांना एफआरएरओचे नोंदणीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, व भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांना 10 वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे, मतदान प्रक्रियेत या नागरिकांना सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, 2008 साली भंडारी दास यांचे प्रकरण विदेशी न्याय प्राधिकरणाकडे आले होते. भारतात आल्यानंतर 41 वर्षांनी सीमा रेषेवरील पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता, असे दास यांच्या वकिलांनी सांगितले.