हद्दच झाली...! मदतीसाठी हेलिकॉप्टर बोलविले, सेल्फी काढून माघारी पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 05:43 PM2018-08-22T17:43:05+5:302018-08-22T17:44:30+5:30
महाभागांकडून मदतकार्यादरम्यान थट्टा केल्याचे प्रकार
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी नौदलाच्या पायलटनी प्रसंगी प्राणांची बाजी लावली असली तरीही काही महाभागांनी या मदतकार्यादरम्यान थट्टा केल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. मरुन्डमधील एका युवकाने असेच मदतीसाठी नौदलाचे हेलिकॉप्टर बोलविले आणि त्यात न बसता चक्क सेल्फी काढून पुन्हा मागारी पाठवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेलिकॉप्टरच्या पायलटनी एका घरावर हेलिकॉप्टर अलगद उतरवत काहींचे प्राण वाचविले होते. केरळमध्ये अतिशय दुर्गम भागात लोक अडकलेले होते. यासाठी नौदलाने सीकिंग ही हेलिकॉप्टर मदतीला पाठिवली होती. या हेलिकॉप्टरद्वारे हजारो जणांचे प्राण वाचिवण्यात आले.
दरम्यान, एका ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या लोकांनी वाचिवण्यासाठी आकाशातून जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटे एका युवकाने लाल टीशर्ट हवेत फडकावत लक्ष वेधून घेतले. या युवकाला वाचविण्यासाठी पायलटने हेलिकॉप्टर लगेचच युवकाच्या दिशेने नेत त्याच्या जवळ उतरवले. या ठिकाणी दलदल असल्याने हेलिकॉप्टर उतरविणे कठीण होते. मात्र, केवळ या युवकाला वाचविण्यासाठी पायलटनी जोखीम उचलली.
मात्र, या युवकाने हद्दच केली. जवान जेव्हा त्याला वाचविण्यासाठी खाली उतरले तेव्हा या महाभागाने खिशातून मोबाईल काढत सेल्फी घ्यायला सुरुवात केली. त्यात जवानांनाही सहभागी करायला सुरुवात केली. यामुळे जवानही हैरान झाले. हे सर्व झाल्यानंतर त्याने जवानांना माघारी जाण्यास सांगितले व हेलिकॉप्टरही माघारी पाठवून दिले.