J-K: कुपवाडामध्ये चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान, मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 09:06 PM2024-11-06T21:06:09+5:302024-11-06T21:16:42+5:30
गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.
J-K : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. त्याच्याकडून एक AK 47 रायफल, चार मॅगझिन, दोन हातबॉम्ब, दारूगोळा आणि युद्धाशी संबंधित इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. कुपवाडाच्या लोलाब जंगल परिसरात ही चकमक झाली.
यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाला होता. टीआरसी कार्यालयाजवळील रविवार बाजारात हा हल्ला करण्यात आला होता. या घटनेत 10 जण जखमी झाले. त्या घटनेच्या एक दिवसापूर्वी खानयारमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एक दहशतवादी मारला होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी ग्रेनेड हल्ला केल्याचा संशय आहे.
अलीकडच्या काळात दहशतवादी हल्ले आणि चकमकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी गटांची नावे समोर आली होती. आजकाल काश्मीरमध्ये अनेक छोट्या संघटना तयार झाल्या आहेत, ज्या अशाप्रकारचा हिंसाचार घडवून आणत आहेत. पण, अशा संघटनांविरोधात भारतीय लष्करदेखील नेहमी अलर्ट मोडवर असते. अशा घटना हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्य सातत्याने प्रयत्न करत आहे.