J&K: घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: May 20, 2017 09:13 PM2017-05-20T21:13:51+5:302017-05-20T21:34:44+5:30

जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न करणा-या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

J & K: The intrusion attempt was in vain, the elimination of 2 terrorists | J&K: घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

J&K: घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Next

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 20 - जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न करणा-या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. शनिवारी संध्याकाळी नौगाम परिसरात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत रोखले.  
 
यात जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत दोन जवान शहीददेखील झाले आहेत. दरम्यान, सीमा रेषेवर अद्यापही ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 
 
लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील कुपवाडा येथील नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी त्यांच्या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देत जवानांनी गोळीबार केला, ज्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात त्यांना यशदेखील आले. मात्र दुसरीकडे, दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचे दोन जवान शहीद झालेत. 
 
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारीच, सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास भारतीय लष्कर त्यास चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला होता. यानंतर शनिवारी लगेचच दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अनेकदा इशारा देऊनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडे असल्याचे वारंवार दिसत आहे.
 
दररम्यान, भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलासा देत पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाच शिवाय जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्कीही झाली. यामुळे बिथरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा कुरापती करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे.  
 
पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर एक्शन टीमचे (BAT) कमांडो तैनात केले आहेत. याद्वारे भारतीय जवानांवर वारंवार विघातक हल्ले करुन जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणे हा त्यांचा उद्देश आहे. दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमचा भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात समावेश राहिला आहे. 
 
"टाइम्स नाउ" या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीममध्ये केवळ सैन्यचं नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे.  गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा आणि विशेष करुन हाजी पीर परिसराजवळ भारतीय जवानांना टार्गेट करण्याचं कटकारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात येत आहे.
 
कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगित देण्यात आली. यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्तानकडून भारतीय जवानांना निशाणा बनवण्यासाठी कट रचला जात आहे. 17 आणि 18 मे रोजी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.  यावेळी भारताकडून झालेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी एसएसजी कमांडो मारला गेला. एलओसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कमांडो पाकिस्तानने सीमारेषेवर का तैनात केले आहेत? याचा तपास करताना  ‘बॅट’ची ही भयावह बाब समोर आली आहे.   

Web Title: J & K: The intrusion attempt was in vain, the elimination of 2 terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.