जे. पी. नड्डा यांच्याकडे २० जानेवारी रोजी सोपविणार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:55 AM2020-01-16T02:55:11+5:302020-01-16T06:56:18+5:30
संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेतहत पक्षाचे निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह २० जानेवारी रोजी नड्डा यांच्या नावाची घोषणा करू शकतात.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हेच भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित असून, २० जानेवारी रोजी त्यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेतहत पक्षाचे निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह २० जानेवारी रोजी नड्डा यांच्या नावाची घोषणा करू शकतात. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहील. भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणासाह काही राज्यांत अलीकडे पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे संघटनात्मक निवडणूक घेता आली नाही. महाराष्ट्रात संघटनात्मक निवडणुकीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर आणि केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मांडविया यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया उशिरा सुरूझाली. त्यामुळे सर्व जिल्हा शाखा स्थापन करण्याचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. सूत्रांनुसार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यातहत राज्यांत मतदान केंद्र, तालुका, जिल्हा आणि प्रदेशस्तरावर संघटनात्मक निवडणुका घेतल्या जात आहेत. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आधी कमीत-कमी ५० राज्यांत संघटनात्मक निवडणूक होणे अनिवार्य आहे. सर्व राज्यांत संघटनात्मक निवडणूक होत आहे. १८ जानेवारीपर्यंत ८० टक्के राज्यांत संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईल.
निवडणूक अधिकारी म्हणून माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह येत्या एक-दोन दिवसांत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख घोषित करतील. निवडणुकीसाठी २० जानेवारी आणि उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमध्ये नड्डा हे आरोग्यमंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. अ. भा. वि. प. आणि अन्य संघटनेतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. १९९३ मध्ये ते पहिल्यांदा हिमाचल विधानसभेवर निवडून आले होते.