जे. पी. नड्डा होणार भाजपचे अध्यक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:05 AM2019-06-12T08:05:44+5:302019-06-12T08:06:21+5:30

गृह खात्याचे काम मोठे : अमित शहा पक्षाध्यक्षपद सोडण्यावर ठाम

J. P. Nadda will be president of BJP! | जे. पी. नड्डा होणार भाजपचे अध्यक्ष!

जे. पी. नड्डा होणार भाजपचे अध्यक्ष!

Next

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्षपद लवकर सोडण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ठाम असून, महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या पदी राहण्याचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला असल्याचे कळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडे सोपविलेली गृह खात्याची जबाबदारी पार पाडण्याकडे मला लक्ष द्यायचे असल्याने अध्यक्षपद अन्य व्यक्तीकडे देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्या अध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यात माजी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे. मनोहर पर्रीकर यांनी २0१७ साली संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात जाण्याचे ठरविले, तेव्हा शहा यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार झाला. तेव्हाही नड्डा यांचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी पुढे आले होते. पण त्या वेळी तसे घडले नसले तरी आता मात्र पक्षाचा अध्यक्ष या पदावर जे. पी. नड्डा यांच्याबाबत एकमत होईल, असे समजते. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ६२ जागा जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, अभाविपमध्येही ते सक्रिय होते. अमित शहा यांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत पक्षाध्यक्षपदी राहावे, अशी पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झाले असले तरी प्रत्यक्ष शहा यांची त्यासाठी तयारी नाही. तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात, असे त्यांचे म्हणणे असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

अध्यक्षपदाबाबत पक्षात कसलीही अस्वस्थता वा अस्थिरता राहू नये, असे त्यांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील लोकसभा निवडणुकांमध्ये विजयाचा मोठा वाटा असलेल्या एका नेत्याला सांगितल्याचे समजते. भाजपमध्ये जे. पी. नड्डा यांच्याखेरीज अन्य नावही नाही. पक्षाचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव यांचे नाव चर्चिले गेले असले आणि पक्षनेतृत्वावर प्रभाव टाकण्यात ते यशस्वी ठरले असले तरी एवढ्या मोठ्या व महत्त्वाच्या पदासाठी त्यांचा आता विचार होणे अवघड दिसत आहे.

Web Title: J. P. Nadda will be president of BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.