वडिलांच्या आठवणीत १२ वर्षांची मुलगी एकटी गेली काशीला, फादर्स डेला घ्यायचं होतं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:14 AM2024-06-19T11:14:45+5:302024-06-19T11:21:39+5:30
मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील १२ वर्षांची मुलगी बाबा विश्वनाथ य़ांच्या दर्शनासाठी एकटीच काशीला पोहोचली. घरातून १५ हजार रुपये घेऊन मुलगी बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी पोहोचली होती. मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दिवंगत वडिलांची आठवण येत असल्याने ती बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी एकटीच गेली होती. मात्र इकडे जबलपूरमध्ये कुटुंबाचं टेन्शन वाढलं. जबलपूरच्या माधोताल पोलीस ठाण्यांतर्गत आयटीआयमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील १२ वर्षीय मुलगी अनुष्का हिला वाराणसीतील बाबा विश्वनाथांचं दर्शन घेण्याची इतकी इच्छा होती की ती रविवारी घरातून एकटीच निघून गेली.
कुटुंबीयांना अनुष्का घरी न दिसल्याने ते चिंतेत पडले आणि त्यांनी माधोतल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ तपास सुरू केला. बसस्थानक, विमानतळ, रेल्वे स्थानकावर तपास सुरू करण्यात आला. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती जीआरपीच्या माध्यमातून आसपासच्या जिल्ह्यांनाही देण्यात आली.
सोमवारी (१७ जून) संध्याकाळी वाराणसी रेल्वे स्थानकावर मुलगी सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस सूत्रांनी सांगितलं की, मुलीची चौकशी केली असता असं समोर आलं की, तिने तिच्या कुटुंबीयांना काशीला जाऊन बाबा विश्वनाथाचं दर्शन घेण्याबाबत अनेकदा सांगितलं होतं, परंतु तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला काशीला जाऊन आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ बाबा विश्वनाथांचे दर्शन घ्यायचं होतं.
अखेर रविवारी अनुष्काने एकटीने वाराणसीला जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि बनारसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. अनुष्काच्या वडिलांचं दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. बाबा विश्वनाथांच्या दर्शनासाठी गेल्या दोन वर्षांपासून ती सतत बोलत होती. त्यामुळे फादर्स डेच्या दिवशी वडिलांची आठवण काढत अनुष्काने बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. १५ हजार रुपये घेऊन ती वाराणसीला गेली आणि तिथे बाबा विश्वनाथांचं दर्शन घेतल्यावर तिला समाधान मिळालं.