मोठा खुलासा! २०० कोटींच्या वसुलीचा आरोप असणाऱ्यानं जॅकलीन फर्नांडिसला केलं होतं टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:22 PM2021-08-30T22:22:17+5:302021-08-30T22:23:06+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश आणि त्याची कथित पत्नी लीना पॉलने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोमवारी दिल्लीत ईडीच्या कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कित्येक तास जॅकलीनची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर यांच्याशी जोडलेले आहे. सुकेशवर याआधीच मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. त्याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावलं होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश आणि त्याची कथित पत्नी लीना पॉलने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. ज्यामुळे ईडीने(ED) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला बोलावलं होतं. जॅकलीन लीना पॉलच्या जाळ्यात अडकली होती. लीना पॉलच्या माध्यमातून सुकेशने जॅकलीन फर्नांडिसला फसवणुकीचं टार्गेट केले होते.
आणखी एक बॉलिवूड कलाकार टार्गेटवर होता
सूत्रांच्या माहितीनुसार, जॅकलीनशिवाय आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फिल्ममेकर यालाही सुकेश टार्गेट करणार होता. ज्याचा खुलासा विशेष पथकाच्या चौकशीत झाला. परंतु एजेन्सीनं त्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला नाही. सुरक्षा कारणास्तव हे नाव सार्वजनिक करणं योग्य नाही असं सांगितले आहे. माहितीनुसार जॅकलीनने ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अनेक महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे.
२०० कोटींच्या खंडणीत जेलमध्ये अडकलाय सुकेश
सुकेश चंद्रशेखर हा तिहाड जेलमध्ये बंद आहे. त्याच्यावर जेलमधूनच २०० कोटीची खंडणी वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अलीकडेच ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री लीना पॉल यांच्या चेन्नई येथील बंगल्यावर धाड टाकली होती. या छापेमारीत ईडीला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि १५ लग्झरी गाड्या मिळाल्या होत्या. तर तेथील बंगल्याची किंमत कोट्यवधी होती.
याआधी, पोलीस सूत्रांनी सांगितले होते की, हाय प्रोफाईल चीटर सुकेश तुरुंगातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या संपर्कात होता आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात प्रकरण मिटवण्याचा दावा करून फोन करून पैसे उकळत होता. कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर जेल प्रशासनाशी संबंधित काही अधिकारी रडारवर आले होते. सुकेश तीच व्यक्ती आहे, ज्याने AIADMK चे उपप्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन निवडणूक चिन्ह मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रकरण उघडकीस आल्यावर गुन्हे शाखेने सुकेशला अटक केली आणि सुकेशच्या माहितीवरून टीटीव्ही दिनाकरनलाही अटक करण्यात आली.