Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; 215 कोटी खंडणी प्रकरणात कोर्टाने पाठवले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 06:43 PM2022-08-31T18:43:33+5:302022-08-31T18:44:59+5:30
Jacqueline Fernandez: न्यायालयाने या प्रकरणी जॅकलिनला 26 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
Jacqueline Fernandez Extortion Case: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावले आहे. न्यायालयाने या प्रकरणी तिला 26 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
नुकतेच या प्रकरणात तपास यंत्रणेने कोर्टात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनला आरोपी बनवण्यात आले होते. याच आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने अभिनेत्रीला आजच्या सुनावणीत समन्स बजावले आहे. त्यामुळे आता जॅकलिनला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
12 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलीस चौकशी करणार
आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला 12 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी पाठवलेल्या समन्सवरही ती हजर झाली नाही. जॅकलिनच्या वकिलाने ती पुढील तारखेला दिल्ली पोलिसांच्या चौकशीसाठी हजर होईल, असे आश्वासन दिले.
215 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपी
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या महिन्याच्या सुरुवातीला तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित सुमारे 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवले होते. सुकेशसोबतच्या कथित संबंधांबाबत जॅकलिनची ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनची 12 लाखांची एफडीही जप्त करण्यात आली होती.
सुकेशची भेट घेऊन जॅकलीन अडकली
ईडीच्या म्हणण्यानुसार, ठग सुकेश चंद्रशेखरने खंडणीच्या पैशातून जॅकलिनला करोडो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या. हे सर्व पैसे सुकेशने गुन्हे करून कमावल्याचे म्हटले आहे. तेव्हापासूनच जॅकलिन ईडीच्या रडारवर आली आहे.