अतिरेकी हल्ल्यांबाबत जाधव देत आहेत माहिती
By admin | Published: May 31, 2017 01:08 AM2017-05-31T01:08:15+5:302017-05-31T01:08:15+5:30
देशात अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यांबाबत भारतीय नागरिक कुलभूषण जाधव हे महत्त्वाची माहिती देत आहेत, असा दावा
इस्लामाबाद : देशात अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यांबाबत भारतीय नागरिक कुलभूषण जाधव हे महत्त्वाची माहिती देत आहेत, असा दावा पाकिस्तानच्या विदेश कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी केला आहे. येथील लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे.
कुलभूषण जाधव यांनी नेमकी काय माहिती दिली, हे सांगण्यास मात्र झकेरिया यांनी नकार दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिली असली तरी अधिकार क्षेत्राच्या बाबतीत निर्णय होणे बाकी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अॅटर्नी जनरल अश्तर औसाफ यांनी सांगितले की, जाधव ‘हेर’असल्याचे पुरावे आहेत.
जाधव यांच्याबाबत पाकिस्तानकडे जी माहिती आहे त्याचा खुलासा सुरक्षेच्या कारणास्तव करता येणार नाही. ही सुनावणी सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयातच हे पुरावे सादर केले जातील.
बंदी घातलेल्या संघटना फेसबुकवर सक्रिय
पाकिस्तानी तालिबान आणि लष्कर-ए-झांगवीसह पाकिस्तानातील बंदी घातलेल्या ६४ संघटनांपैकी ४१ संघटना फेसबुकवर सक्रिय आहेत. लोक एका क्लिकने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, या संघटनांचे पेज, ग्रुप्स आणि यूजर प्रोफाईल फेसबुकवर उपलब्ध आहेत.