...तर पाकिस्तानात जाऊन जाधव यांचा खटला लढवेन- अॅड. उज्ज्वल निकम
By admin | Published: April 16, 2017 05:18 PM2017-04-16T17:18:54+5:302017-04-16T17:19:25+5:30
ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भारतीय नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांचा खटला चालवणा-या वकिलांना लाहोर बार काऊन्सिल (लाहोर वकील संघ)नं परवाना रद्द करण्याची धमकी दिली असतानाच भारतातले नावाजलेले आणि ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणात पाकिस्तानात जाऊन त्यांचा खटला लढवण्यास तयार असल्याचं ते म्हणाले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी पाकिस्तानवर टीकाही केली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले, पाकिस्तान हा अस्थिर सरकार असलेला देश आहे. कुलभूषण जाधव यांना कोणालाही न भेटण्याच्या पाकिस्ताननं दिलेल्या निर्णयाचं मला आश्चर्यच वाटतं.
उज्ज्वल निकम यांनी जाधव प्रकरणावरून पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला काऊन्सिलर एक्सेस न देणे हे सिद्ध करतं की, जाधव यांचा कथित जबाब हा दबावाखाली घेण्यात आला. पाकिस्तानची पोलखोल होऊ नये म्हणूनच पाकिस्तान जाधव यांना कोणालाही भेटण्यास देत नाही. त्यामुळे पाकिस्तानची प्रवृत्ती समोर आली आहे. पाकिस्ताननं जाधवसंदर्भात काय पुरावे आहेत ते सांगावं ?, असा प्रश्नही उज्ज्वल निकम यांनी पाक सरकारला विचारला आहे.
पाकिस्तान आणि भारताचे कायदे जवळपास एकसारखेच आहेत. जर एखादा आरोपी स्वतःच्या जबाबावर कायम न राहिल्यास दुस-या पक्षकाराला आरोपीच्या विरोधात पुरावे द्यावे लागतात. त्यामुळेच जाधव यांना जगासमोर आणलं जात नाही. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आतापर्यंत पाकिस्ताननं जाधव यांच्यासंदर्भात कोणत्याही माहितीची सार्वजनिकरीत्या भारतासोबत देवाणघेवाण केली नाही. पाकिस्तानला 13 वेळा बार अपील करण्यासाठी सांगण्यात आलं असून, पाकिस्ताननं प्रत्येक वेळी अपील फेटाळून लावलं आहे.