"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:08 PM2024-09-23T23:08:00+5:302024-09-23T23:10:07+5:30
Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे.
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. यावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. मंगलगिरी येथील जनसेना पक्ष कार्यालयात पवन कल्याण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यावेळी ते (रेड्डी) माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते इतकेच म्हणू शकले असते की, जो कोणी दोषी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याचे मन शुद्ध असेल तर हे सर्व नाटक करण्याची गरज नाही, असे पवन कल्याण यांनी म्हटले.
पुढे पवन कल्याण म्हणाले की, रेड्डी यांनी स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाच्या देखरेखीखाली हा कथित घोटाळा झाला होता. टीटीडी हे तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे. तसेच, रेड्डी यांना दोष देत नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या, म्हणून रेड्डी यांनी सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारच्या अंतर्गत व्यवस्थेला आपले काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सांगितले.
चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आरोप
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली आहे.