आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:03 PM2019-06-06T15:03:57+5:302019-06-06T15:06:11+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
अमरावतीः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून 'रायतू भरोसा' योजना लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,500 रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपी सरकारची 'अन्नदाता सुखीभव' योजना रद्द केली आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारनं फेब्रुवारी 2019ला निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत चंद्रबाबूंनी शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यापासून जगनमोहन रेड्डी जलद गतीनं निर्णय घेत आहेत. तत्पूर्वी जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे.
आंध्रच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वृद्धांची प्रतिमहिना पेन्शन वाढवून हजार रुपयांवरून तीन हजार करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रस्तावित ग्राम सचिवालयासाठी चाल लाख ग्राम स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत प्रतिमहिना पाच हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. जगनमोहन सरकारने दणक्यात सुरुवात करत राज्यातील आशा वर्कर्संच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. त्यानुसार, यापूर्वी 3 हजार रुपये वेतन घेणाऱ्या आशा वर्कर्संना आता 10 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. तसेच, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहेत. ग्रामीण स्तरावरील आशा वर्कर्स यांच्या कामाचे महत्व आणि त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री जगनमोहन यांनी हा निर्णय घेतला आहे. जगनमोहन यांच्या प्रजा संकल्प यात्रेवेळी, काही आशा वर्कर्संने भेट घेऊन आपली करुण कहानी जगनमोहन यांना सांगितली होती. त्यावेळी रेड्डी यांनी या आशा वर्कर्संना वेतनवाढीचे आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.
ताडेपल्ली येथील या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच्या आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच, आरोग्य विभागात भ्रष्टाचार कदापी सहन केला जाणार नाही, अशी सूचनाही जगनमोहन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. या विभागासंदर्भात 45 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जगनमोहन यांनी दिले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबूंच्या गडाल उद्धवस्त करत वायएसआर काँग्रेसचे सरकार स्थापन केले आहे.