जगमोहन रेड्डींना महिला आमदारांनी बांधली राखी तर दिशाच्या वडिलांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 09:51 AM2019-12-14T09:51:33+5:302019-12-14T10:00:57+5:30
आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा अॅक्ट 2019 साठी मंजूरी देण्यात आली आहे.
हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डींनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार, बलात्कार प्रकरणात सर्वात कडक आणि तात्काळ शिक्षा देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा अॅक्ट नावाने नवीन कायदा लागू केला आहे. शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत या कायद्याला संमती देण्यात आली आहे. त्यानंतर, तेथील महिला आमदारांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींना राखी बांधून त्यांचे आभार मानले. तर, दिशाच्या वडिलांनीही जगनमोहन यांना धन्यवाद दिले.
आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा अॅक्ट 2019 साठी मंजूरी देण्यात आली आहे. गृहमंत्री मेकतोटी सूचरिता यांच्याकडून शुक्रवारी विधासनभेत दिशा अॅक्ट विधेयक मांडण्यात आले होते. त्यानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात केवळ 21 दिवसांत खटला निकाली काढण्यात येणार आहे. तसेच, याप्रकरणी दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. पोलिसांनी सबळ पुरावे आणि साक्षी शोधून 7 दिवसांत तपास पूर्ण करावा, त्यानंतर 14 दिवसांत या खटल्याचं न्यायालयीन कामकाज पूर्ण व्हावं, असे या विधेयकात म्हटले आहे. सध्याच्या कायदयानुसार फास्टट्रॅक कोर्टात या गुन्ह्यातील खटला चालविण्यासाठी 4 महिन्यांचा अवधी देण्यात येतो.
दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारच्या या नवीन कायद्यानुसार राज्यातील 13 जिल्ह्यात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील गंभीता लक्षात घेऊन 10 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा या कायद्यान्वये करण्यात येईल. दरम्यान, हैदराबाद दिशा गँगरेप आणि मर्डर प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले आहेत. या कायद्याला दिशा अॅक्ट नाव देण्यात आल्याने आणि देशातील महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जगमोहन यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत दीशाच्या वडिलांनी म्हटले.
जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती. तसेच तेलंगणा पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. देशात काहींनी या एन्काऊंटरला विरोध केला होता, तर काहींनी पोलिसांच्या कृतींचं समर्थन केलं आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चेदरम्यान सीएम जगनमोहन रेड्डी, यांनी मी दोन मुलींचा बाप असल्याचंही सांगितलं. मला एक बहीण आहे आणि एक पत्नी आहे. जर माझ्या मुलींसोबत असं काही झालं असतं तर माझी काय प्रतिक्रिया असती?, मी कोणता न्याय मागितला असता?, असंही रेड्डींनी म्हटले होते.