जगन्नाथांच्या रथयात्रेला लाखो भाविकांची हजेरी, भाविकांनी २ किलोमीटरपर्यंत रथ ओढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:30 AM2019-07-05T03:30:13+5:302019-07-05T03:30:26+5:30
मुख्यमंत्री नवीन पटनाईक, इतर मंत्री, आमदार व इतर महत्वाच्या व्यक्ती या महत्वाच्या महोत्सवासाठी पुरीमध्ये हजर होत्या.
भुवनेश्वर : भगवान जगन्नाथांच्या वार्षिक रथयात्रा महोत्सवात गुरुवारी लक्षावधी भाविक उत्साहाने सहभागी झाले होते. रथयात्रेनिमित्त येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
ओदिशात महिनाभरापूर्वीच फॅनी वादळाने ६४ जणांचे प्राण घेतले होते. तरीही लोकांमध्ये मोठा उत्साह होता. सर्व संबंधितांच्यासहकार्याने वेळापत्रकाप्रमाणे सगळ््या विधी पार पडल्या, असे श्री जगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक पी. के. मोहापात्र यांनी सांगितले. रथयात्रे दरम्यान भाविकांनी भगवान बालभद्र, भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या मूर्ती बाराव्या शतकातील या मंदिरातून बाहेर काढल्या. या पारंपरिक रथयात्रेला पहांदी असे म्हणतात. भगवान जगन्नाथ हे त्यांच्या ‘नंदीघोष’ नावाच्या रथात बसले होते तर भगवान बालभद्र ‘तलद्वज’वर आणि देवी सुभद्रा भगवान सुदर्शन यांच्यासोबत ‘दर्पादालन’ रथावर बसली आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनाईक, इतर मंत्री, आमदार व इतर महत्वाच्या व्यक्ती या महत्वाच्या महोत्सवासाठी पुरीमध्ये हजर होत्या. नवीन पटनाईक यांनी या महोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आणि लोकांच्या समृद्धीसाठी भगवंतांचे आशीर्वाद मागितले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सोन्याचा झाडू
पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चिलानंद सरस्वती यांनी या मूर्तींना अभिवादन केले. पुरीचे गजपती महाराज दिव्यांसिंघा देब यांचे त्यांच्या राजेशाही पालखीतून आगमन झाले. त्यानंतर त्यांनी ‘छेर्रा पन्हारा’ हा विधी पार पाडला. सोन्याच्या झाडूने हा रथ पुरोहितांकडून उच्चारल्या जोणाऱ्या श्लोकांच्या साक्षीने त्यांनी झाडून घेतला. लोकांनी हे रथ जवळपास २.१५ किलोमीटर ओढत नेले, असे मोहापात्र म्हणाले.