JP Nadda: जगतप्रकाश नड्डा पुन्हा भाजपच्या अध्यक्षपदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:27 AM2022-08-30T10:27:14+5:302022-08-30T10:40:50+5:30
JP Nadda: भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी फेरनिवड होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने भाजप नेतृत्वाने विचार सुरू केला आहे. अमित शहा यांना २०१९ साली केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी फेरनिवड होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने भाजप नेतृत्वाने विचार सुरू केला आहे. अमित शहा यांना २०१९ साली केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्यांची या पदावर तीन वर्षांसाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जानेवारी २०२० मध्ये औपचारिकरीत्या निवड केली होती.
भाजपचे अध्यक्ष म्हणून जगतप्रकाश नड्डा यांनी आजवर बजावलेल्या कामगिरीने त्या पक्षातील तसेच संघपरिवारातील नेते समाधानी आहेत. नड्डा यांच्या हाती भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा ठेवून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी, असा त्या पक्षाच्या नेत्यांचा विचार आहे.
भाजपचे अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी सर्व राज्यांमध्ये भाजपने संघटनात्मक बदल केले आहेत. उत्तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी भूपेंद्र चौधरी यांची निवड करण्यात आली. सुनील बन्सल हे आता भाजपचे पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा या राज्यांचे प्रभारी बनले आहेत.
बिहार भाजपमध्येही बदलांची शक्यता
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी राजदशी आघाडी करून नवे सरकार स्थापन केल्यानंतर त्या राज्यात भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये असे बदल गुजरात, हिमाचल प्रदेशमध्येही दिसू शकतील. गेल्या काही काळात भाजपने महाराष्ट्रासह काही राज्यांत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली. बी. एस. येडीयुरप्पा यांना भाजपच्या संसदीय मंडळामध्ये घेतल्याने कर्नाटकमधील मुख्यमंत्री बदलाची चर्चा आता थंडावली आहे.