जगदीप धनखड यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर; विरोधकांची आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:22 AM2022-07-17T05:22:59+5:302022-07-17T05:23:58+5:30
उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल व भाजप नेते जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार असतील. ही घोषणा भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी शनिवारी केली.
नड्डा म्हणाले की, शेतकऱ्याचे पुत्र असलेले जगदीप धनखड यांनी आपल्या उत्तम कामाने ते जनतेचे राज्यपाल असल्याचे सिद्ध केले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड यांच्या नावाला भाजपच्या संसदीय मंडळाने मंजुरी दिली.
राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त
जगदीप धनखड यांचा जन्म राजस्थानातील किथाना या गावी १८ मे १९५१ रोजी झाला. धनखड यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून केलेली कामगिरी वादग्रस्त ठरली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व धनखड यांच्यात सतत वादाचे प्रसंग उद्भवले. ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेबाबत जगदीप धनखड जाहीर नाराजी व्यक्त करून ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरत.
शरद पवारांच्या नेतृत्वात विरोधकांची आज बैठक
उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात रविवारला दिल्लीत होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १९ जुलै आहे. दोन्ही पक्षांना रविवारपर्यंत उमेदवार घोषित करणे आवश्यक आहे.