जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:50 IST2025-04-06T19:48:30+5:302025-04-06T19:50:19+5:30
शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल म्हणाले. काही दिवसापासून त्यांना शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली होती.

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा
शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी १३१ दिवसांपासून उपोषण करणारे संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर आज उपोषण थांबवले आहे. फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या महापंचायतीत त्यांनी ही घोषणा केली आणि पाणी घेतले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल यांनी जाहीर केले.
गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबर २०२४ पासून उपोषण सुरू केले होते. काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.
'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा
४ मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले होते. यापूर्वी, पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले होते की डल्लेवाल यांनी त्यांचे उपोषण सोडले आहे, शेतकरी संघटनांनी सरकारचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते.
जगजीत सिंग यांनी श्री फतेहगड साहिब येथील शेतकऱ्यांच्या महापंचायतीलाही संबोधित केले. त्यांनी सांगितले की एम.एस.पी. आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत त्यांचा लढा सुरूच राहील. डल्लेवाल म्हणाले की, सरकारने आमच्यावर मोठा हल्ला केला आहे. चळवळ सुरू आहे, सुरू राहील आणि शेवटपर्यंत सुरू राहील. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.
डल्लेवाल म्हणाले की, पंजाब सरकारने केंद्र सरकारसमोर झुकले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केवळ शेतकऱ्यांवर हल्ला केला नाही तर संपूर्ण पंजाबच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या सरकारला मुलींचा, मातांचा किंवा मोठ्यांचा आदर करण्याची जाणीव नाही. आंदोलन सुरूच आहे. पुढे काय होईल हे मला माहित नाही. शेतकऱ्यांनी अपील केले होते, म्हणून मी उपोषण सोडत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.