Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारात मोठी कारवाई, आरोपींच्या अवैध मालमत्तांवर चालणार 'बुलडोजर'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:40 AM2022-04-20T08:40:27+5:302022-04-20T08:49:55+5:30
Jahangirpuri Violence: हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणात आता बुलडोझरची एंट्री झाली आहे. आरोपींचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी आज आणि उद्या मोहीम राबविण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी(Jahangirpuri Violence) येथे हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचार प्रकरणात सामील असलेल्या आरोपींवर बुलडोझर कारवाई होणार आहे. जहांगीरपुरी हिंसाचाराच्या आरोपींनी केलेल्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. आता उत्तर दिल्ली महापालिकेने जहांगीरपुरी भागातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची घोषणा केली आहे.
आज आणि उद्या कारवाई होणार
उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या वतीने या संदर्भात उत्तर पश्चिमच्या पोलिस उपायुक्तांना पत्र लिहून कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी 400 दिल्ली पोलिस कर्मचारी तैनात करण्याची मागणी केली आहे. उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या वतीने 20 आणि 21 एप्रिल रोजी जहांगीरपुरी भागातील बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपचे महापौरांना पत्र
दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही याबाबत उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरांना पत्र लिहिले होते. महापौरांना लिहिलेल्या पत्रात हनुमान जयंतीच्या दिवशी 16 एप्रिल रोजी मिरवणुकीवर असामाजिक तत्वांनी केलेल्या दगडफेकीचा उल्लेख केला होता. तसेच, या समाजकंटकांना आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार आणि नगरपरिषदेचे संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला.