UP Police on Alert: जहांगीरपुरी हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश अलर्ट मोडवर, पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:21 AM2022-04-17T08:21:18+5:302022-04-17T09:06:50+5:30
UP Police on Alert: हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: काल(16 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार (Delhi Jahangirpuri Violence) झाल्याची घटना घडली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केली. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, त्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशपोलिसांनी शनिवारी राज्यव्यापी अलर्ट जारी केला.
पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
यूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) प्रशांत कुमार म्हणाले की, दिल्लीतील जहांगीरपुरी घटनेनंतर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील संवेदनशील भागांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अधिका-यांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत नेमकं काय झालं?
हनुमान जन्मोत्सवानिमित्त दिल्लीतील जहांगीरपुरी भागात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. यानंतर दोन समुदायांमध्ये मोठा हिंसाचार उसळला. यामध्ये पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. जखमींना जहांगीरपुरी येथून बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल
या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक दगडफेक आणि जाळपोळ करताना दिसत आहेत. जाळपोळ आणि दगडफेकीच्या वेळी हेल्मेट घातलेले पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले. काही व्हिडिओंमध्ये तरूण दगडफेक करतानाही दिसत आहेत.