Jahangirpuri Violence: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये पुन्हा गोंधळ; पोलीस पथकावर दगडफेक, 1 पोलीस अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:52 PM2022-04-18T14:52:43+5:302022-04-18T14:53:56+5:30
Jahangirpuri Violence: शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये हिंसाचार झाला होता, त्यानंतर आता आजही पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली:दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंसाचारानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच आज(सोमवारी) दुपारी हिंसाचार प्रकरणात एका महिलेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दगडफेकीच्या घटनेचे फोटो शेअर केले आहेत.
एनएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अतिरिक्त डीसीपी मयंक बन्सल यांना विचारण्यात आले की परिसरात पुन्हा दगडफेक झाली आहे का? त्यावर त्यांनी थेट उत्तर न देता सांगितले की मला आधी परिस्थिती पाहू द्या. एजन्सीने सांगितले की, हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरी भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Delhi | Heavy police presence at Jahangirpuri following the incident of violence on Hanuman Jayanti pic.twitter.com/JT0ijktdOw
— ANI (@ANI) April 18, 2022
आज नेमकं काय झालं?
शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे 50 महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.
शनिवारी काय झालं?
जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. त्यात एका स्थानिक व्यक्तीसह आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यादरम्यान एका पोलिसाला गोळीही लागली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली असून आणखीही काही जणांना अटक होणार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी बंदुका आणि दारूगोळाही जप्त केला आहे.