संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 06:21 IST2024-12-20T06:20:29+5:302024-12-20T06:21:18+5:30
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट, प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते.

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाल्यामुळे गृहमंत्री अमित शाह व भाजपचा विरोध करण्यासाठी गुरुवारी विरोधी पक्षाचे अनेक खासदार संसद परिसरात निळे कपडे घालून आंदोलन केले. त्यांच्यासमोर सत्ताधारी सदस्यांनीही आंदोलन केले. संसद परिसर ‘जय भीम’च्या नाऱ्याने दणाणून गेला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट, प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते.
शाह यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. सभापती जगदीप धनखड यांच्याकडे खरगेंनी नोटीस सुपुर्द केली. शाह यांनी १७ डिसेंबर रोजी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ‘संविधानाचा ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेचे उत्तर देताना आंबेडकरांचा अवमान केला.
उत्तर प्रदेश विधानसभेतही गदारोळ
शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेल्या उद्गारांबाबत उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ माजविला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. शाह यांनी आंबेडकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी बसपच्या प्रमुख मायावती यांनी केली. कर्नाटक विधानसभेत बाकांवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र.