जय हिंद पापा... शहीद कर्नल सिंग यांना अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 07:12 AM2023-09-16T07:12:03+5:302023-09-16T07:12:26+5:30

चंडीगड : ‘जय हिंद पापा...’ हे शब्द आहेत शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचा सहा वर्षांचा मुलगा कबीर याचे. सैन्याचा ...

Jai Hind Papa... Tears burst while bidding the last farewell to martyred Colonel Singh | जय हिंद पापा... शहीद कर्नल सिंग यांना अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला

जय हिंद पापा... शहीद कर्नल सिंग यांना अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला

googlenewsNext

चंडीगड : ‘जय हिंद पापा...’ हे शब्द आहेत शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचा सहा वर्षांचा मुलगा कबीर याचे. सैन्याचा गणवेश परिधान करून त्याने वडिलांना अखेरचा निरोप दिला तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बलिदान देणाऱ्या सिंग यांच्यावर पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल सिंग यांच्या भरौंजियन गावातील घरी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कर्नल मनप्रीत यांच्या पत्नी, आई आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे कुटुंबीय अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सैन्यातील एक अधिकारी कबीरला मांडीवर घेऊन बसले होते. एका नातेवाईकाने त्यांची दोन वर्षांची मुलगी बन्नी हिला कडेवर घेतले होते.

कर्नल सिंग यांची आई आपल्या मुलाच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत घरात दरवाजाजवळ बसली होती. मनप्रीत हे आपल्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सैनिक होते. त्यांचे वडीलही माजी सैनिक होते आणि त्यांचे ९ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. शहीद मनप्रीत यांच्या पश्चात पत्नी जगमीत कौर, दोन मुले, आई मनजीत कौर आणि भाऊ संदीप असा परिवार आहे. शहिदाची पत्नी हरयाणातील पंचकुला येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहे. 

मेजर ढोचक यांना निरोप देण्यासाठी उसळली गर्दी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद मेजर आशिष ढोचक यांना त्यांच्या मूळ गावी पानिपत येथे हजारो लोकांनी लष्करी सन्मानाने अंतिम निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेत शोकाकूल परिवारासोबत लष्कराचे अधिकारीही उपस्थित होते. 
शहीद मेजर ढोचक यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी पानिपत येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. तेथून त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनातून त्यांच्या मूळ गावी बिंझोल येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला शहरातील त्यांच्या घरापासून त्यांच्या मूळ गावी बिंझोलपर्यंत आठ किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे तीन तासांचा अवधी लागला. 
कारण मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या बाजूला उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने शाळकरी मुले तिरंगा घेऊन उभी होती. 
मेजर ढोचक यांचे कुटुंब ऑक्टोबरमध्ये पानिपतमधील त्यांच्या नवीन घरात जाणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. 

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत ड्रोनचा वापर 
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत ड्रोनचा वापर केला जात आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरू असलेली कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. 

Web Title: Jai Hind Papa... Tears burst while bidding the last farewell to martyred Colonel Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.