जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:37 PM2022-07-09T21:37:48+5:302022-07-09T21:41:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी, लाखोंचा जनसागर भीमातिरी जमला आहे. काय हे रिंगण.. काय हा पाऊस... काय ही गर्दी... आणि काय हा वारकऱ्यांचा उत्साह... असा दैदिप्यमान सोहळा, वैष्णवांचा मेळा पंढरपूरात जमला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात येत आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आमदार शहाजीबापू पाटील यांचा संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संवादाची भुरळ आषाढी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांनाही झाल्याचं दिसून आलं. वारकऱ्यांच्या तोंडी शुक्रवारी हा डायलॉग पुन्हा ऐकावयास मिळाला. वारीत वातावरण भक्तीमय झालं असून पांडुरंगाच्या ओढीने लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात पोहोचले आहेत. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनही कामाला लागलं आहे. तर, स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आषाढीच एकादशीनिमित्त वारकरी आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जय जय रामकृष्ण हरी.. असे म्हणत मोदींनी आषाढीचं महत्त्वही समजावून सांगितलं आहे.
आषाढी एकादशी भक्तीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मा. पंतप्रधान @narendramodiजींनी माढा येथील भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पत्र पाठवलंय. त्यातून मोदीजींच्या विठ्ठलभक्तीचाही प्रत्यय येतोय. धन्यवाद मोदीजी, आपल्या शुभेच्छांमुळे आषाढीचा आनंद द्विगुणित झाला आहे. pic.twitter.com/E6sRVXKrXs
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 9, 2022
माझी पांडुरंगावरची श्रद्धा अढळ आहे. शतकानुशतकं चालत आलेल्या पताका-दिंडी, वारीकडं आजही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामूहिक यात्रा (वारी) म्हणून पाहिलं जातं. वारकरी चळवळ ही आपल्या समृद्ध परंपरांचं प्रतिक आहे. दिंडी यात्रा ही भारताच्या शाश्वत शिकवणीचं प्रतीक आहे, जी आपल्याला आचरण आणि विचार शिकवते, असं सांगत मोदींनी आषाढी एकादशीनिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.