जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:52 PM2024-01-31T12:52:33+5:302024-01-31T12:53:36+5:30
...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले.
संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात राम मंदिराचा उल्लेख केला आणि संपूर्ण सभागृह टाळ्या आणि जय श्रीरामच्या घोषणेने दणाणून गेले. राष्ट्रपती मुर्मू यांनी, राम मंदिराची इच्छा आता पूर्ण झाली आहे, असे म्हणताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाक वाजवायला सुरुवात केली. यानंतर सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, गेल्या शेकडो वर्षांपासून राम मंदिराची इच्छा होती. आज ते साकार झाले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 संदर्भातील शंका आज इतिहास झाल्या आहेत. तीन तलाक संदर्भात कडक कायदा तयार करण्यात आला आहे.
भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला -
राष्ट्रपती म्हणाल्या, "पूर्वी पूर्णपणे कोलमडलेली बँकिंग व्यवस्था आज जगातील सर्वात मजबूत व्यवस्था बनली आहे. पूर्वी डबल डिजिट असलेला NPA आता केवळ 4 टक्के राहिला आहे. काही वर्षांपूर्वी भारत खेळणी आयात करायचा, मात्र आज मेड इन इंडिया खेळणी निर्यात करत आहे. भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तेजस हे लढाऊ विमान आता आपल्या हवाई दलाची ताकद बनत आहे."
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील काही महत्वाचे मुद्दे -
- युवाशक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार अत्यंत महत्त्वाच्या चार स्तंभांच्या बळावर हा देश उभा आहे. १० कोटींहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. ११ कोटी ग्रामस्थांपर्यंत पाईपने पाणी पोहोचले आहे.
- कोरोनाच्या काळात ८० कोटी देशवासीयांना मोफत रेशन दिले. आता येत्या ५ वर्षांसाठी ही योजना वाढवण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून विकास भारत संपर्क यात्रा सुरू असून आतापर्यंत सुमारे १९ कोटी देशबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत.
- गेल्या दोन वर्षांत जगाने दोन युद्धे आणि कोरोनासारखी महामारी पाहिली आहे. असे असतानाही केंद्र सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली. सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही. २०१४ पूर्वी १० वर्षांत सरासरी महागाई दर ८ टक्क्यांहून अधिक होता. परंतु, गेल्या दशकांतील सरासरी चलनवाढ ५ टक्के राहिली.
- पूर्वी देशवासीयांच्या २ लाखांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता. आज भारतात ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. केंद्र सरकारने शेतीचा खर्च कमी करून नफा वाढवला आहे. पहिल्यांदाच देशातील कृषी आराखड्यात १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना महत्त्व दिले आहे.
- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. दोन वर्षांत शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सुलभ कर्जात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांना MSP च्या माध्यमातून अंदाजे १८ लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त खते मिळावीत यासाठी १० वर्षांत ११ लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.