जय श्रीराम! अयोध्येतील रामललाचे फोटो आले समोर; राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:12 PM2024-01-19T13:12:07+5:302024-01-19T13:23:49+5:30
अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवलेल्या रामललाच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत.
नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवलेल्या रामललाच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये रामललाचे संपूर्ण रूप पाहायला मिळते. तसेच रामललाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून फुलांचा हार घालण्यात आला आहे. २२ जानेवारीला राम लल्लाला अभिषेक केला जाईल, त्यानंतर डोळ्यांची पट्टी काढली जाईल. २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही मंदिरात जाता येणार आहे.
गुरुवारी नव्याने बांधलेल्या मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकूण चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. भगवान रामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधीसह पीठावर ठेवली होती. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संत उपस्थित होते.
बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विधींनी सुरुवात झाली. प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा देखील झाली. अयोध्येतील नवीन मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने याची सांगता होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरू झाले असून ते अभिषेक समारंभापर्यंत सुरू राहील. अकरा पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करून विधी करत आहेत, असे राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले.
प्रायश्चित, कर्मकुटी पूजा कशासाठी?
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी अनावधानाने काही चुका झाल्यास किंवा आतापर्यंतच्या एकूण कार्यात कमतरता राहिल्यास त्याबाबतचे प्रायश्चित म्हणून ही पूजा केली जाते. कर्मकुटी पूजा म्हणजे यज्ञशाळा पूजन होय. यामध्ये भगवान विष्णूंना आवाहन करून त्यांच्याकडून मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळविली जाते.
२२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.