जय श्रीराम! बंगालमध्ये ममता आणि भाजपाच्या लढाईत पोस्ट खात्याचं वाढलं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 11:11 AM2019-06-07T11:11:10+5:302019-06-07T11:12:12+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. ममता बॅनर्जींसमोर जय श्रीराम म्हटल्याने काही जणांवर कारवाई केली गेल्याच्या निषेधार्थ भाजपाने ममता बॅनर्जींना जय श्रीराम असा उल्लेख असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर तृणमूल काँग्रेसकडून जय हिंद जय बांगला या घोषवाक्याद्वारे जय श्रीरामला प्रत्युत्तर दिले जात आहे.पण दोन्ही पक्षांमध्ये पत्रांद्वारे सुरू असलेल्या शीतयुद्धात पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांची मात्र पळापळ होत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात जय श्रीराम हा नारा देण्यास सुरुवात केली होती. अगदी समोरासमोर या घोषणा दिल्या गेल्याने ममता बॅनर्जी यांचा तीळपापड झाल्याचेही अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जींच्या पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवण्यात येत असल्याने ममता बॅनर्जींचे निवासस्थान असलेल्या दक्षिण कोलकात्यामधील कालीघाट पोस्ट ऑफीसमध्ये दररोज हजारो पत्रांचा ढीग जमत आहे.
पोस्ट खात्यामधील कर्मचाऱ्यांसाठी पोस्टकार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येक पत्राला कर्मचाऱ्यांकडून सुनियोजित पद्धतीने हाताळले जाते. दरम्यान, पोस्ट ऑफीसमधील सूत्रांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांना सरासरी 30 ते 40 पत्रे आणि रजिस्टर पत्रे येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांना येणाऱ्या पत्रांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या ममता बॅनर्जींना येणाऱ्या पत्रांची संख्या ही या पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या एकूण पत्रसंख्येपैकी दहा टक्के आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जींच्या नावे येणारी पत्रे त्यांच्या निवासस्थानी पोच करण्यासाठी खास एका पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पोस्टमन ही पत्रे घेऊन रोज ममतांच्या निवासस्थानी येतो आणि संबंधित व्यक्तिकडे देऊन निघून जातो, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
दरम्यान, रेल्वे मेल सर्व्हिसनेसुद्धा ममता बॅनर्जींसाठी आलेली सुमारे 4 हजार 500 पत्रे वेगळी केली आहेत. तसेच या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जीं संतप्त झाल्या असून, त्यांच्याकडूनही पोस्ट कार्डला पोस्ट कार्डने प्रत्युत्तर देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. जय श्रीराम ऐवजी जय हिंद, जय बांगला असे उल्लेख असलेली पोस्टकार्ड तृणमूलकडून नरेंद्र मोदींना पाठवण्यातच येत आहेत.